Subscribe Us

कृष्णा-मराठवाडा,सिंचन कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीचे वावडे...


उस्मानाबाद / तेरणेचा छावा :- येथील कृष्णा-मराठवाडा, सिंचन कार्यालयामध्ये संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे.
        या कार्यालयांना संत जगनाडे महाराजांचे वावडे आहे काय? असा संतप्त सवाल  तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर   यांनी उपस्थित केला जात आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना  यासंदर्भात संबंधित शासकीय कार्यालयावर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. 
      राज्य शासनाने सर्व निमशासकीय कार्यालयामध्ये जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात परिपत्रक जारी केलेले आहे. यामध्ये दिनांक,तिथी वार आणि नावांचा तपशील दिलेला आहे. 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती असल्याने पत्रकार बांधवांनी उस्मानाबाद येथील कृष्णा मराठवाडा, उपसा सिंचन,उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्रमांक 1, उस्मानाबाद लहू पाटबंधारे विभाग या कार्यालयामध्ये सकाळी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती उजेडात आणली आहे.
        उस्मानाबाद लघु पाटबंधारे विभाग या ठिकाणी कार्यकारी अभियंता गैरहजर होते. कार्यालयामध्ये दिनेश पवार आणि टेंगरे हे खाजगी कर्मचारी हजर होते. वी.के बांगर यांच्याकडे विचारणा केली असता कार्यकारी अभियंता निकिता हेमने आणि उपकार्यकारी अभियंता दोन्हीही कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यालय उस्मानाबाद असतानाही यांचे वास्तव्य सोलापूरला असल्याचे सांगण्यात आले.या ठिकाणी 9 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 5 नियमित कर्मचारी उपस्थित होते.
     उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्रमांक 1 या ठिकाणी कार्यकारी अभियंता एस. एस.आवटे हजर होते.कार्यालयीन अधीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांकडे जयंती संदर्भात विचारणा केली असता, कोणाची जयंती आहे.? आम्हाला माहिती नाही. असे सांगण्यात आले. कार्यालयातील सोळंकी हे प्रथम अधिकारी लातूरला खाजगी कामानिमित्त गेल्याची सांगण्यात आले.या कार्यालयामध्ये 22 कर्मचारी नेमणुकीला असताना केवळ 3 कर्मचारी उपस्थित होते.
     कृष्णा मराठवाडा कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. मात्र कार्यालयात एकही कर्मचारी दिसून आला नाही. एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने या ठिकाणची तपशीलवार माहिती मिळू शकली नाही.
       उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता  पालवणकर औरंगाबादला बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वी गेले. त्यानंतर ते कार्यालयात आलेच नसल्याचे के. ए. गायकवाड यांनी सांगितले, कार्यालयात 4 कनिष्ठ लिपिक 1 भांडारपाल 1 शिपाई अशी पदे मंजूर आहेत. यापैकी कार्यालय प्रमुख पालवणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, दुपारनंतर उस्मानाबादच्या कार्यालयात येणार आहे जयंती कोणाची आहे?हे माहीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
        उपसा सिंचन विभागामध्ये केवळ जनाबाई नामदेव काकडे या चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी उपस्थित होत्या तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि  लिपिक काटे यांना जयंती विषयी विचारणा केली असता कालच दत्त जयंती साजरी केलेली आहे.? आज कुठली? असा सवाल उपस्थित केला.या कर्मचाऱ्यांना आज शासकीय जयंती आहे.हे सांगता आले नाही.
उपसा सिंचन कार्यालयात उपविभागीय अभियंता सांगळे, कायम गैरहजर असतात असे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने सांगितले. कार्यालयातील प्रमुख लिपिक शिंदे गैरहजर असल्याने जयंती विषयी त्यांना काहीही माहिती देता आली नाही. प्रतिनियुक्ती वरील कर्मचारी या ठिकाणी कार्यालयात गप्पा मारत असल्याचे दिसून आले.
        राज्य शासनाचे परिपत्रक असतानाही संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी न करणाऱ्या कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी व तसा अहवाल तेली समाज संघटनेला द्यावा अशी मागणी रवी कोरे आळणीकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments