Subscribe Us

तडवळा गावचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध



कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणारच. 
 देवदत्त मोरे 



उस्मानाबाद / तेरणेचा  छावा :-
ग्रामीण भागामधील जनतेला देखील शहरी भागात असलेल्या सर्व सुविधा मिळाव्यात व त्यांचे एकंदरीतच जीवनमान उंचवावे अशी अपेक्षा आहे. मात्र गावस्तरीय पुढारी विशेषतः ग्रामपंचायतची कारभारी असलेली सरपंच व सदस्य मंडळी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. एकीकडे देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भाग अतिमागास होत चाललेला आहे. हे चित्र बदलण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळावासियांना आवश्यक असलेले कायमस्वरुपी पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील स्वच्छता, अंडरग्राउंड गटारी, बस स्थानक परिसरात सार्वजनिक सुलभ शौचालय, तालीम, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, पशुवैद्यकीय दवाखाना आदी मूलभूत व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय गावचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचे किंगमेकर तथा उद्योजक देवदत्त मोरे यांनी तेरणेचा छावाशी बोलताना दिली.
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथे नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन झाले असून या गावात अनेक असुविधांचा नागरिकांना सामना करावा लागला व लागत आहे. त्यामुळे केवळ गावचा विकास हाच मुद्दा घेऊन कोंडाप्पा कोरे, तानाजी जमाले, तुळशीदास जमाले, शहाजी वाघ, चंद्रकांत जमाले, सुधीर करंजकर व डॉ. धनंजय करंजकर आदींसह ज्येष्ठ मंडळींनी विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन ग्रामस्थांना धनशक्ती विरुद्ध आपल्याला केवळ आणि केवळ विकासासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन निवडून देण्याची विनंती केली. ग्रामस्थांनी देखील आम्ही केलेल्या विनंतीला मान देत आमच्या पॅनलचे १७ पैकी ११ उमेदवार व १ सरपंचपदाचा उमेदवार असे १२ सदस्य निवडून दिले. त्यामुळे आम्ही देखील दिलेला शब्द पाळून तडवळावासियांना आवश्यक कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या पुढील काळात प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणारच असे देवदत्त मोरे यांनी ठामपणे सांगितले. 

चौकट

गावांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी चोराखळी तलावातून १६.८० लाख रुपये किंमतीची २०१२ साली सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. मात्र आजपर्यंतच्या कारभाऱ्यांनी ती राबविली नाही. त्यामुळे नागरिकांना दर १५ दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

चौकट

गावामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे. ती स्वच्छता राखण्यासाठी आणखीन स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच रस्त्यापेक्षा गटारी उंच असल्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यातच साचत आहे. ते घाण पाणी वाहते करण्यासाठी अंडरग्राउंड गटार योजना राबवून गावातील सर्व सांडपाणी नदीला सोडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

चौकट

वर्षाला २०० घरकुले उभारून नागरिकांना पक्क्या निवासस्थानची व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर बस स्टॉपचे बांधकाम करण्यासह बस स्टॉप व बाजारपेठ परिसरात सुलभ शौचालय स्त्री व पुरुषांसाठी बांधण्यात येणार आहेत. त्याचा वापर ठेकेदारामार्फत नाममात्र दरात करण्यात येणार आहे. तसेच तरुणांना व्यायाम करता यावा यासाठी तालीम देखील बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी १०.८० कोटी रुपये तर शाळेच्या जागेसाठी १.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यासाठी मार्केट यार्डची ६.५४५ चौरस मीटर जागा घेतली आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेचे स्थलांतर केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे मोरे यांनी आवर्जून सांगितले. 

चौकट
सरपंचपदी स्वाती विशाल जमाले तर सदस्यपदी धनाजी विठ्ठल भालेराव, हारुन सत्तार शेख, हिराबाई दादा पवार, प्रताप विश्वनाथ करंजकर, बारामती धनाजी होगले, महानंदा तानाजी मोरे, संगीता रणजीत पाटील, शिवकन्या धनाजी कोरे, निवृत्ती करंजकर, चंद्रकला भजनदास जमाले व सुभाष रामचंद्र धनके यांना निवडून दिले आहे.

Post a Comment

0 Comments