Subscribe Us

दोन टन गांजाच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशातील सहा जणांना ठेवले डांबून; पोलिसांकडून सुटका


      सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांची कौतुकास्पद कामगिरी.
  
  उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
 दोन टन गांजा आणून देण्याच्या मागणीसाठी आंध्रप्रदेश येथील सहा जणांना भूम तालुक्यातील वांगी येथील सुभाष अण्णा पवार यानी गेल्या अनेक दिवसापासून डांबून ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघड करण्यात उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांना यश आले असून या सगळ्यांची सुटका करून आरोपीला अटक करण्या आली आहे.
     सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून भुम तालुक्यातील वांगी येथील सुभाष पवार यांनी आंध्रप्रदेश येथील पांगी गोवर्धन, पांगी धनलक्ष्मी, पांगी तरुण (वय – 4), पांगी संदीप (वय – 2), पांगी यशोदा व जेमिली नागेंद्र बाबू (सर्व रा. येबुलम जिल्हा सीतारामाराजु, आंध्रप्रदेश) याना डांबून ठेवले होते. पवार हा डांबून ठेवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करून दोन टन गांजा आणून देण्याची मागणी करत होता.
    गांजा आणून दिल्यास माझ्या ताब्यातील तुमचे नातेवाईक घेऊन जा असे म्हणत होता. या प्रकरणी अपहरणग्रस्तच्या नातेवाईकांनी आंध्रप्रदेश येथील जे.की.विधी पोलिस ठाण्यात भूम तालुक्यातील वांगी येथील सुभाष पवार यांच्या विरुद्ध अपहरण करून सहा जणांना डांबून ठेवण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तपास व आंध्रप्रदेश येथील पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहायक पोलीस अधिक्षक एम रमेश यांना दिल्या होत्या.
    त्यानुसार आंध्रप्रदेश येथील पोलिस पथक २६ जून रोजी उस्मानाबाद येथे दाखल  झाले.
     पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार येथील सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्वतः आणि त्यांची टीमने भूम तालुक्यात फिरून माहिती घेतली पण सुगावा लागत नव्हता. दरम्यान सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी आपले कसब दाखवीत गुप्त माहिती घेऊन वांगी येथील सुभाष पवार याचे घर, शेतीची रेकी करण्यात आली. यात पवार याने दोन टन गांजासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सहा जणांना डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डांबून ठेवलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली असून आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. ही धाडसी कामगिरी सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश, सहायक पोलीस निरीक्षक जी.पी.पुजरवाड, किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांनी केली.
      अपहरणग्रस्त पुरुष, महिला, लहान मुले यांच्या जे वाट्याला आले ते ऐकून आणि पाहून अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. गेल्या अनेक महिन्यांपासून अपहरणग्रुस्त कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. याबाबत घडलेल्या अन्यायाबाबत अपहरणग्रस्त कुटुंबांनी पोलिसांसमोर कथन केले.
    कळंब उपविभागीय कार्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश  रुजू झाल्यापासून अनेक धाडसी कारवाया करत असल्यामुळे जनतेमध्येत् यांची वेगळी छाप निर्माण झाली आहे.चोऱ्या रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून आत्मनिर्भर बनवणे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,पोलीस स्टेशनमध्ये जनता दरबार आयोजित करणे ,जनतेमध्ये आपला फोन नंबर सार्वजनिक करून अडचणीसाठी 24 तास उपलब्ध असणे यामुळे जनतेमध्ये 
त्यांच्याविषयी वेगळी छाप निर्माण झालेली आहे.
    त्यांनी केलेल्या धाडसी व कौतुकास्पद कामगिरीमुळे जनतेतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments