Subscribe Us

जिल्हयात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू



    उस्मानाबाद/तेरणेचा छावा 
उस्मानाबाद जिल्हयात  सण आणि उत्सव  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्यामुळे जिल्हयात आज दि.29 जून ते 13 जुलै 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) जमाव व शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात  येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.
   सध्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे विविध  पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत,तसेच. प्रेषित याचे विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेच्या निषेधार्थ विविध मुस्लीम संघटनांच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आषाढीवारी यात्रा पंढरपूर निमित्त विविध संतांच्या पालख्या, पायी दिंडया मोठया प्रमाणात उस्मानाबाद जिल्हयातुन श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गस्थ होतात. दिनांक 10 जुलै 2022 रोजी बकरी ईद (चंद्र दर्शनावर अवलंबुन एक दिवस पुढे मागे) साजरी होणार आहे. दिनांक 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमा सण साजरे होणार आहे. 
    उस्मानाबाद जिल्हयात ग्रामिण/शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा/ऊरूस लहान मोठया स्वरूपात साजरे होणार आहेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच विविध शेतकरी पक्ष व संघटना  यांच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, निर्देशने व  रस्ता रोको इत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तेव्हा जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबांधित राखण्यासाठी जमावबंदी व शस्त्रबंदी लागु करण्यात येत आहे.
      या आदेशा नुसार पुढील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत, लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तू बाळगणार नाहीत,कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत,दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.आवेशी भाषणे,अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत,व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक अथवा मोर्चा काढता येणार नाही.असेही या आदेशात श्री.दिवेगावकर यांनी म्हटले आहे.
                                                   

Post a Comment

0 Comments