Subscribe Us

उस्मानाबाद येथे सैनिक फेडरेशनची स्थापना.




वन रँक वन पेन्शनसह सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारणार - ब्रिगेडियर सुधीर सावंत

उस्मानाबाद -/ तेरणेेेेचा छावा:-
आजी-माजी सैनिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षापूर्वी स्थापन केलेलेल्या सैनिक फेडरेशनची शाखा उस्मानाबाद येथे सुरू करण्यात आली आहे. सैनिकांसाठी काम करणार्‍या विविध संघटनांना एकत्रित  करुन वन रँक वन पेन्शनसह विविध मागण्यांकरिता मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले.

उस्मानाबाद येथे सैनिक फेडरेशनची स्थापना सोमवारी (दि.14) ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उपस्थित माजी सैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, प्रवक्ते डी.एफ. निंबाळकर, सुरेश कांबळे, राजाराम कोळगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना, ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, सन 1991 साली वन रँक वन पेन्शनचा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करुन पाठपुरावा केला होता. सरकारने सुरुवातीला सकारात्मकता दाखविली, मात्र अद्यापही हा प्रश्न रखडलेला आहे. सैनिक सीमेवर लढत असताना इकडे त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न काहीजण करतात. अशा प्रकरणासह सैनिकांच्या अनेक मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत.

सरकारी कर्मचार्‍याला अठ्ठावन्न वर्षापर्यत नोकरी देते. परंतु सैनिकाला 15 वर्षानंतर रस्त्यावर फेकले जाते. हा सर्वात मोठा अन्याय सैनिकांवर आहे. त्यामुळे सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर सैनिकाला नागरी सेवेत सामावून घेतले पाहिजे. सन 2004 नंतर सैनिक कल्याण समितीची बैठकच घेतलेली नाही. सुमारे हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत. मात्र ही रक्कम खर्च केली जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे आजी-माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर मोठे आंदोलन करुन सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार असल्याचे ब्रिगेडियर सावंत म्हणाले.

सैनिकांच्या कल्याणासाठी यापुढेही प्रयत्न करणार - मकरंद राजेनिंबाळकर

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून नेहमीच पुढाकार घेतला आहे. नगर परिषदेमार्फत माजी सैनिकांना घरपट्टी व नळपट्टी आकारली जात नाही. तसेच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरु करण्यात आलेल्या दवाखान्याला देखील नगर परिषदेने प्रशस्त जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. माजी सैनिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी आपण यापुढेही सदैव प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
सांघिक लढा उभारला पाहिजे - संजय पाटील दुधगावकर
सैनिकांचे प्रश्न सैनिकच चांगल्या प्रकारे मांडू शकतात. परंतु आपण एकत्र येत नसल्यामुळे सरकारपर्यंत आवाज पोहचत नाही. म्हणून माजी सैनिकांनी सांघिक लढा उभारला पाहिजे. त्यासाठी आता सैनिक फेडरेशनचे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. आम्हाला सैनिकांचा अभिमान आहेच. त्यामुळे आगामी काळात आम्ही सैनिक फेडरेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यात सैनिक मेळावा - कौस्तुभ दिवेगावकर
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैनिक फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेऊन सैनिकाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन येत्या एप्रिल महिन्यात माजी सैनिकांचा मेळावा घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ब्रिगेडियर सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments