Subscribe Us

छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ सतीश कदम तर स्वागताध्यक्ष आमदार कैलास पाटील.




कळंब /तेरणेचा छावा:- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मराठवाडा आयोजित कळंब येथे येत्या रविवारी दिनांक 19 रोजी होऊ घातलेल्या 13 व्या अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी  सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ सतीश कदम यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिली आहे, संमेलनाध्यक्ष निवडी संदर्भात साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कळंब येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ सतीश कदम यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,लातूर विभागीय अध्यक्ष बालाजी सुरवसे, जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद, तालुकाध्यक्ष अश्रूबा कोठावळे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. डॉ सतीश कदम यांची मराठ्यांचा इतिहास, अषटयुगात शिवराय, मराठ्यांच्या इतिहासातील नवीन संदर्भ, हैद्राबाद मुक्ती संग्रामात असे झुंजलो आम्ही, जागर स्वराज्याचा आदी पुस्तके प्रकाशित असुन आजवर अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील असुन उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक व इतिहास संशोधक शरद गोरे हे असणार आहेत. 19 डिसेंबर सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ होणार असुन त्यानंतर परीसंवाद व कविसंमेलन त्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.

Post a Comment

0 Comments