तेरणेचा छावा कळंब
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का ? शाळेभोवती पाणी साचून शाळेला सुट्टी मिळेल का? हे विद्यार्थी प्रिय गीत मुलांच्या मनात पूर्वी रुंजी घालत असे. आता नेमकी उलटी परिस्थिती करोनामुळे झाली असून, मित्र, मैदानाविना चार भिंतीतील ऑनलाईन शाळेने बालमन हरपून बसलेली मुले त्यांच्या भोलानाथाकडे दीड वर्षांपासून मिळालेली 'सुट्टी' कधी संपेल म्हणून आणि पाऊस पडावा, म्हणून आर्जव करताना दिसत आहेत.
मुल भोलानाथकडे आता विनंती करत आहेत. सांग सांग.... भोलानाथ कोरोना जाऊन शाळा कधी भरेल रे !सांग ना रे ! भोलानाथ कोरोना कधी जाईल आणि आमची शाळा पुन्हा कधी भरेल. आम्हाला घरात बसून कंटाळा आलाय रे! काय करावे कोरोना नावाचे संकट अख्ख्या जगावर आलंय रे ! अचानक आले आणि गेल्या दीड वर्षापासून होत्याचं नव्हतं झालं. अनेक लोक मृत्युमुखी पडले. आमची काही मित्रंही पोरकी झाली आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील अनेक मुलांपैकी कोणी आई गमावली कोणाचे पितृछ्त्र हरपले.
भोलानाथ आम्ही आमची शाळा, आमचा वर्ग, वर्गशिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक या दीड वर्षात पाहिले सुद्धा नाहीत रे! आणि आम्ही दुसरीच्या वर्गात गेलो. दुसऱ्या मुलांच्या आधीच्या वर्गाच्या गुणावर मूल्यमापन झालं पण आम्ही तर काहीच पाहिलं नाही. आणि आज मी दुसरी च्या वर्गात गेलो.
भोलानाथ पाऊस पाड रे.... शाळेभोवती साचू दे तळे... पण शाळा सुरू होऊ दे, करोनाची कटकट घालव रे... या कोरोना नावाचा विषाणू जगातून नष्ट कर रे बाबा !
आम्हाला आमची शाळा, वर्ग, वर्ग शिक्षक ,मुख्याध्यापक मित्र-मैत्रिणींमध्ये अभ्यासासोबत मस्ती करायची रे! दोन वर्ष झाले आम्हाला घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले रे! कंटाळा आला रे! सर ,मॅडम बरोबर आम्हाला गप्पा मारायच्यात. दीड वर्षात अनेक प्रश्न मनात साचली आहेत. ती गुरुजनांना विचारायची आहेत. त्यांच्याकडून उत्तरे घ्यायची आहेत. काही नवीन त्यांच्याकडून शिकायचे रे! काहीही न शिकता शाळेत न जाता. मी पुढच्या वर्गात जाऊन काय करणार सांग ना रे! भोलानाथ.
माझे बाबा सांगतात आता म्हणे तिसरी कोरोना ची लाट येणार आहे .आणि ती पण लहान मुलावर, मग तर यावर्षी पण आमची शाळा भरणारच नाही. आम्हाला घरी बसून कंटाळा आला रे! आम्हाला कोणी खेळायला पण बाहेर जाऊ देत नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीने !
कोरोना येण्याअगोदर आम्ही मोबाईल ला हात लावला की आई-बाबा डाफरायचे. डोळे वटारून म्हणायचे मोबाईल घेऊ नको. पुस्तक घे! परंतु आता बाबाच म्हणतात हा घे मोबाईल. करत बस अभ्यास. मोबाईल वरून ऑनलाईन वर्ग करून डोळे दुखू लागले रे !त्यामुळे अगोदर आम्हाला हवाहवासा वाटणारा मोबाईल, पण आता नकोसा झाला रे! तूच कर ना काय तरी, आणि कोरोना या जगातून नष्ट कर रे! सगळे झटतात रे! सरकार, डॉक्टर अंकल, सिस्टर मावशी, रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून काम करतात रे !पूर्वी परीक्षा रद्द झाल्या तर ?शाळेची घंटा वाजली नाही तर ?असे निबंध मराठीत येत होते. असे माझे पप्पा मला सांगत आहेत. हे कधीकाळी खरे होईल असे त्यावेळी वाटत पण नव्हते. पण ते कोरोना विषाणू ने करून दाखवले. भोलानाथ कोरोना जाऊन पुन्हा शाळा भरेल का? प्लीज कर ना काही तरी शाळा भरण्यासाठी आणि पाऊसही येण्यासाठी... करशील ना भोलानाथ ? सांग ना !
संभाजी गिड्डे , कळंब
0 Comments