Subscribe Us

अभ्यासाशिवाय पर्याय नाही पोरांनो पुस्तकं वाचा-प्रा.प्रदिप सोळुंके


नामवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने  नागरी सत्कार

 दहिफळ /तेरणेचा छावा :-
कळंब तालुक्यातील   दहिफळ येथील नामवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि.23 मार्च) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     यावेळी एमपीएससी मधून अन्नसुरक्षा अधिकारी वर्ग 2 या पदावर नियुक्ती झालेले ऋषिकेश मते, अबोली भातलवंडे  वर्ल्ड स्टार ग्लोबल बेस्ट स्टुडंट 2024 या जागतिक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल , सोनल मते सहाय्यक अभियंता अंधेरी विभाग मुंबई वर्ग 2 या पदावर नियुक्ती बद्दल दहिफळ ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा प्रसिद्ध वक्ते प्रदीप दादा सोळुंके यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ संदीप तांबारे यांची उपस्थिती होती.
     यावेळी ऋषिकेश मते यांनी आपला जीवन प्रवास सर्वांसमोर उघडला. पहिल्या वेळेस पोस्टमास्तर परीक्षा पास करत 11 महिने नोकरी केली त्यानंतर अभ्यास चालू असतानाच ग्रामसेवक पदाची परीक्षा देत उत्तीर्ण झाल्यानंतर दोन महिने नोकरी केली, त्यानंतर एमपीएससी चा निकाल आला व  निवड ओपन रँक मधून 27 व्या स्थानी राजपत्रित अधिकारी अन्नसुरक्षा अधिकारी वर्ग 2 म्हणून निवड झाली. कोणतेही काम नोकरी अथवा धंदा बारीक मोठा नसतो.कोणत्याही क्षेत्रात आपण प्रमाणिक काम केल्यानंतर आपल्याला यश आपोआपच मिळते.
    अबोली भातलवंडे आपला जीवन प्रवास सांगताना माझ्या वडीलाकडे 30 गुंठे जमीन आम्ही दोन मुलीच त्यामुळे वडिलांनी मुलगा मुलगी असा भेद न करता आमचा सांभाळ केला. एक दिवस शेतात वडीलाबरोबर काम करत असताना वडिलांनी शेतातील कांद्याच्या या पाचोळा व पातीचं या टाकाऊ वस्तूचं काहीतरी करायला पाहिजे. या वाक्यामुळे मी या क्षेत्रात संशोधन करायचे ठरविले व कांद्याचा पाचोळा व पात यापासून प्लास्टिक निर्मितीसाठी संशोधन करून यात यश मिळवले या यशामुळे मला जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका येथील संस्थेकडून जागतिक बेस्ट स्टुडंट्स अवार्ड 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष दिल्यानंतर यश आपोआपच मिळत असते यात परिस्थितीचा बाऊ करू नये असेही तिने यावेळी सांगितले. पालक शहाजी मते यांनी यावेळी सांगितले की पालकांनी विद्यार्थ्यावर बोजा न देता त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणासाठी लातूरला पाठविले परंतु अपेक्षित यश नाही मिळाल्यामुळे मी नाराज न होता विद्यार्थ्याला विश्वासात घेत जिद्द चिकाटीचे चार शब्द सांगत तुला जे करायचे ते कर मी तुझ्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास दिला यातूनच त्याने मोठे यश मिळविल्याचे सांगितले. गावातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याचे ही त्यांनी आवर्जून सांगितले. 
    यावेळी बोलताना सोळुंके म्हणाले की विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करा नोकऱ्या तुमची वाट पाहत आहेत. मोठ्या नोकऱ्या मिळाल्या तर पोरीची आपोआप लाईन तुमच्या घराकडे लागेल. त्यामुळे आता लाईन मारायच्या भानगडीत न पडता तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला मोठ्या नोकरीच्या संधी सहज उपलब्ध आहेत. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर सपाट. टीव्ही मोबाईलच्या नादाला लागून आपले उज्वल भवितव्य अंधकारमय बनवू नका. कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात मोबाईल मधूनही चांगले तेवढेच घ्या.मोबाईल मुळे आपल्याला संपूर्ण जागतिक ज्ञान प्राप्त होते. डॉ.तांबारे बोलताना म्हणाले की आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ग्रामीण विद्यार्थी टॅलेंटची कमी नाही त्यामुळे स्पर्धेत आपण अव्वलच असल्याचे दाखवून दिले आहे. 
    याप्रसंगी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर सावंत यांनीही गुणवंतांचा सत्कार करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी भातलवंडे , सूत्रसंचालन प्रा. तुषार वाघमारे तर आभार प्रा. गणेश मते यांनी केले.
कार्यक्रमासाठी सुनील पाटील ,सतीश भातलवंडे, शहाजी मते सुरेश मते, प्रशांत भातलवंडे, बापूराव मते, रामेश्वर भातलवंडे, व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments