Subscribe Us

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन 140 कोर्सेसना विद्यापीठ अधिसभेची मंजुरी


 धाराशिव /तेरणेचा छावा:-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात  140 नवीन विविध व्यावसायिक अभ्यासक्रम कोर्सेस सुरू होणार आहेत.यात पर्यटन आणि पुरातत्व शास्त्र,तुळजापूरची आई तुळजाभवानीची कवड्याची माळ , पोत आणि परडी तयार करणे, भूम आणि सरमकुंडी परिसरात उत्पादित होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांपासून विविध उपपदार्थ तयार करणे यासह शेती अवजारे दुरुस्ती- तयार करणे ,पॉलिहाऊस उभारणी, सिंचन संच दुरुस्ती , मधमाशीपालन , सेंद्रिय शेती , तुळजापूरचा पारंपारिक जागरण गोंधळ तसेच विविध प्रकारची लोककला लोकसंस्कृती , ड्रेस डिझाईनिंग, फॅशन डिझायनिंग , चित्रकला,डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे कौशल्य अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहेत . धाराशिव जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मिती करून धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल , याकडे या बृहत आराखड्यात विशेष लक्ष दिले गेले असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री देविदास पाठक यांनी दिली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अधिसभेने 2024 -25 ते 2028 -29 पर्यंत पाच वर्षाचा बृहत आराखडा आधीसभा बैठकीत नुकताच मंजूर केला आहे.या बृहत आराखड्यात धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती, लोककला , नैसर्गिक सौंदर्य ,नैसर्गिक ठेवा , पर्यटन दृष्ट्या ऐतिहासिक ठेवा याचे जतन संवर्धन आणि त्यातून रोजगार निर्मिती यावर भर देण्यात आला आहे.
 यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या पूजेसाठी वापरण्यात येणारी परडी पोत आणि कवड्याची माळ याला देशभरातून असलेली मागणी आणि त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना याच्या निर्मितीचे कौशल्य अवगत व्हावे यासाठी अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच भूम  सरमकुंडी वाशी परिसरात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पन्न आहे, त्यावर प्रक्रिया करून उत्पादित होणारा खवा तसेच इतर उपपदार्थ याला भारताच्या कानाकोपऱ्यात मागणी आहे, या दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करण्याचा कौशल्य प्रशिक्षण कोर्स या बृहत आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.
याशिवाय धाराशिव जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेती आणि शेतीपूरक व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश यात करण्यात आला आहे. यात शेती अवजारे तयार करणे, शेती अवजारे दुरुस्ती , ठिबक सिंचन संच दुरुस्ती ,पॉलिहाऊस उभारणी , सेंद्रिय शेती यासह मधुमक्षिका पालन या व्यवसायांचा यात समावेश करण्यात आला आहे.या सोबतच धाराशिव जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील डेटा सायन्स ,  आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस ,सिक्युरिटी,तसेच वाणिज्य विषयक कोर्सेस ची रचना या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहे.याशिवाय ज्या ठिकाणी एखाद्या कोर्सेसची मागणी झाली आहे अशा विद्या शाखेचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.
अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  अधिसभा सदस्य श्री देविदास पाठक यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments