Subscribe Us

तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार - कदम



आगामी सर्व निवडणुका भारत राष्ट्र समिती स्वबळावर लढविणार
धाराशिव/तेरणेचा छावा: - भारत राष्ट्र समिती या पक्षाला तेलंगणा या राज्यात एकहाती सत्ता मिळाली. महाराष्ट्रात देखील सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी भारत राष्ट्र समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती व विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. तेलंगणा राज्यामध्ये ग्रामीण भागासह शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील गरिबांसह शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सर्व प्रकारच्या योजना राबवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माणिकराव कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१३ जून रोजी दिले.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर, संजय भिसे, शशिकांत बेगमपुरे, ज्ञानेश कामटेकर, ऍड रुपेश माळजे पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कदम म्हणाले की, भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये विकासाचे मॉडेल उभे केले आहे. शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टर, पेरणीसाठी बी-बियाणांसह आवश्यक मदत, दलितांसाठी दलित बंधू योजनेच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी १० लाख रुपये बिन परताव्याचे दिले जातात. तसेच मुलाच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी मुलगी जन्मली तर १३०१६ रुपये व मुलगा जन्मला तर १२०१६ रुपये त्यांच्या पालकांना दिले जातात. तसेच केसीआर किट दिले जाते. विशेष म्हणजे तेलंगणा राज्यात २४ तास वीज उपलब्ध करून दिल्यामुळे जलसिंचन क्षेत्र झपाट्याने वाढवून शेतकऱ्यांची भरभराट केली आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. वयस्कर शेतकरी, निराधार यांना दरमहा मानधन देण्यासह शेतकऱ्यांचे नैसर्गिक किंवा अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला १० दिवसांच्या आत ५ लाख रुपये तर भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्याचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला तीन दिवसांच्या आत २ लाख रुपये मदत दिली जाते. मुलीच्या लग्नासाठी १,००११६ योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक व्हावी यासाठी तेलंगणा राज्यात ७ हजार आधार भुत खरेदी क्रेंद सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या राज्यात प्रत्येक कुटुंबाला आरसीसी घरे बांधून देण्यात आले असल्यामुळे एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहिलेले नाही.  मात्र महाराष्ट्रात आजघडीला २ लाख २३ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार हे धरणी पोर्टलच्या माध्यमातून केले जात आहेत. त्यामुळे विक्री झाल्यानंतर सातबारावर नाव ओढण्यासाठी तलाठ्याची आवश्यकता भासत नाही. तर तेलंगणातील वाळू माफिया राज संपविले असून महसूलमध्ये ३७८० कोटीवर महसूल जमा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मानधन देण्यासह इतर विविध घोषणा करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा टोला लगावला.

महाराष्ट्रात या पक्षाची ४ लाख सभासद नोंदणी झाली असून अनेकजण या पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत.  शेतकरी पक्षाचे नेते स्व शरद जोशी यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली केले जात असल्याचे सांगितले. सर्वांगीण विकासाचे काम तेलंगाणामध्ये होत असल्यामुळे ते राज्य देशांमध्ये सर्व बाबतीत अग्रेसर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Post a Comment

0 Comments