Subscribe Us

आरोग्यमंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून सुंदर माझा दवाखाना स्वच्छता मोहीम राज्यभर राबणार


धाराशिव/ तेरणेचा छावा:- राज्यभरातील प्रत्येक शासकीय दवाखाने स्वच्छ रहावेत व ठेवावेत यासाठी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून...सुंदर माझा दवाखाना... स्वच्छता मोहीम दि.७ ते १४ एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. 
दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून जनमानसात आरोग्य सेवा अधिक सुंदर, स्वच्छ व लोकाभिमुख करण्यासाठी दि. ७ ते १४ एप्रिल या कालावधीत सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.  
  यावर्षी जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य संपूर्ण जगभरात... सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य.... सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे व आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे हे आहे. तसेच विविध आरोग्य विषयक धोरणे तयार करुन त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले जाते. तसेच शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त...सुंदर माझा दवाखाना...हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
    सध्या आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. हा स्वच्छता दिवस  नियमित राबवायचा असून स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाचे आयक्त मा.धीरज कुमार यांनी सर्व जिल्ह्यांना पत्राद्वारे “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत.  या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये दिनांक ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
      या उपक्रमात आरोग्य संस्था व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी विभागीय उपसंचालक , जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments