न्याय मिळवून देण्याची शिक्षकांची मागणी
धाराशिव / तेरणेचा छावा:-- गेल्या १०-१२ वर्षापासून विना अनुदानित तत्वावर शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना एक रुपयाही मानधन दिले नाही. मात्र २० टक्के अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतल्यापासून या शिक्षक व कर्मचाऱ्यांना डोनेशन द्यावे असे फर्मान काढून सतत संस्थाचालक मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. त्यात कहर म्हणजे संस्थाचालकांनी त्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना तुम्ही शाळेत ठेवायचं नाही असे म्हणत चक्क त्यांना मारहाण केली. तसेच यापुढे आला तर तलवारीने तुम्हाला संपवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे त्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधिताकडे आम्हाला न्याय द्यावा असा आर्त टाहो फोडला आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील मातोश्री त्रिवेणी बाई मोरे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले एस.यु. पाचंगे, पी.एम. नारायणकर व सेवक अतुल कोरे या महाविद्यालयामध्ये गेल्या १० ते १२ वर्षांपासून विना वेतन, विना मोबदला व उपाशीपोटी ज्ञानदानाचे काम करीत आहेत. हे महाविद्यालय विनाअनुदानित असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत एक रुपयाही न घेता मोफत ज्ञानदानाचे काम केलेले आहे. नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदान शासनाचे मिळालेले आहे. ते अनुदान त्यांना अद्याप पर्यंत दिले जात नसल्यामुळे त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली आहे. ती तक्रार केल्यापासून संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब विठ्ठलराव मोरे, सचिव रणजीत विठ्ठलराव मोरे सदस्य विठ्ठलराव जगन्नाथ मोरे यांनी दि.१० मार्च रोजी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुखी करून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर प्रा. संजयकुमार पाचंगे यांचा मोबाईल बाळासाहेब मोरे यांनी बळजबरी करून घेतला आहे व तो अध्यापि परत न दिल्यामुळे त्याचा काही गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो परत मिळण्यासाठी कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणांमध्ये संस्थाचालक कडून आमच्या जीवनात धोका निर्माण झाला असून आम्हाला कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत पुणे येथील शिक्षण आयुक्त, विभागीय आयुक्त, विभागीय उपसंचालक लातूर, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, गट शिक्षणाधिकारी तुळजापूर, तहसिलदार, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.
0 Comments