कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल आंदोरा येथील सौ.सुमन तांबारे यांचा गौरव
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा -
उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदोरा (ता.कळंब) येथील जेईपी मसाला उद्योगाची लज्जत सर्वदूर पसरली आहे. अल्पावधीतच लौकिक मिळविलेल्या या उद्योगाची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित तुळजाभवानी कृषी महोत्सवातही दखल घेतली आहे. महोत्सवात जेईपी मसाले उद्योगाच्या संचालक सौ.सुमन माणिकराव तांबारे यांना कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मंगळवारी (दि.14) जिल्ह्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायात लौकिक प्राप्त केलेल्या व्यक्ती, संस्थांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आंदोरा येथील जेईपी मसाले उद्योगाने अल्पावधीतच भरारी घेतल्याबद्दल संचालक सौ.सुमन तांबारे यांना उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माणिकराव तांबारे, डॉ.संदीप तांबारे, रवि शेळके तसेच कृषी विभागाचे अधिकारी, प्रगतशील शेतकरी, शेतकरी गटाचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
जेईपी ब्रॅन्डमार्फत सौ.सुमन माणिकराव तांबारे या मटण मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, काळे तिखट या उत्पादनांची निर्मिती करतात. सेंद्रीय उत्पादने आणि विक्रीमध्ये अग्रेसर असलेल्या येडाई फूड प्रॉडक्टच्या साह्याने त्यांनी ही उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. या विक्रीतून वर्षभरात जेईपीला तब्बल पाच लाखाचा नफा मिळाला आहे.
0 Comments