उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:- ग्रामीण भागात राहण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. ज्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेतून म्हणजेच प्रधानमंत्री आवास, रमाई आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व शबरी आवास योजनेंतर्गत जास्तीत जास्त घरकुलास मंजुरी द्यावी. त्यामुळे जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.
पुढे बोलताना डॉ.ओंबासे म्हणाले की, जिल्ह्यातही नागरिकांना प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व शबरी आवास या योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना जागेची अडचण आहे, अशा लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू आहे. या माध्यमातून प्रती लाभार्थी ५० हजार रुपये अर्थसाह्य करण्यात येते. मात्र यासाठी लाभार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. कारण त्यासाठी जमीन तुकडे बंदी कायद्याची अडचण येत आहे. तसेच गावालगत महसूल विभाग व गावठाणच्या जमिनीवर (जागेवर) अतिक्रमण करून राहत असलेल्यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. ते मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना असून त्यांच्या मंजुरीनंतरच त्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात येते.
परंडा तालुक्यातील खासापुरी येथील विस्थापित कुटुंबांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना येत्या दोन ते चार दिवसांमध्ये जमीन हस्तांतर करण्यात येणार असून त्यानंतर विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. तर सार्वजनिक शौचालय बांधण्यास १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेच्या माध्यमातून १०९ कुटुंबांना रमाई आवास बांधकाम करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments