उस्मानाबाद /तेरणेचा छावा:- ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात येऊन प्रत्येक साखर कारखान्यांवर ऊस तोडणीचे काम करीत असलेल्या ऊसतोड कामगारांची माहिती संबंधित तहसिलदारांनी घेऊन त्यांची नोंदणी करावी. तसेच समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र द्यावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.२९ डिसेंबर रोजी दिले.
ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ते सोडविण्यासाठी ऊसतोड मजूर कामगार संघटना जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब अरवत, सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांच्यासह तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मनुष्यबळ व हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीसाठी देण्यात येणाऱ्या रकमेमधील तफावती बाबत चर्चा करण्यात आली. तर ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसतोड कामगारांना रेशन मिळत नाही. तेथे संबंधित तहसिलदारांनी साईडवर जाऊन त्यांना धान्य वितरित करण्यासाठी संबंधितांना सोबत घ्यावे. तसेच ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना उस्मानाबाद, तुळजापूर व उमरगा या तालुक्याच्या ठिकाणी मुली व मुलांसाठी स्वतंत्र १०० विद्यार्थी क्षमतेचे श्री संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर कामगारांना निवाऱ्यासाठी टेंट देण्यात यावा, पायात घन बूट, पिण्याच्या पाण्याची सुविधा व तात्पुरते शौचालय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच मागील ३ वर्षाच्या कालावधी ऊसतोड कामगार कामावर असताना ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे परंडा तालुक्यातील भैरवनाथ साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करणाऱ्या कामगारांना स्वतः तहसिलदारांनी फडावर जाऊन त्यांना रेशन वितरीत करावे, असे आदेश व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिले. या बैठकीस तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, शशिकांत राठोड, तालुकाध्यक्ष प्रताप राठोड, कोषाध्यक्ष संतोष पवार, अॅड प्रेमदास आडे, अॅड शरद राठोड, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments