Subscribe Us

पत्रकारांनी वस्तुनिष्ठ व कमी शब्दांत बातमी लिहावी - यशवंत भंडारे



एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळेत विविध विषयावर मार्गदर्शन
कळंब/ तेरणेचा छावा:- पत्रकारांनी वस्तनिष्ठ व कमी शब्दात लिखाण करावे असे लिखाण केल्यास वाचकांची संख्या वाढण्यास मदत होईल. साने गुरुजी हे भाषा लेखनातले गुरु आहेत.त्यांची पुस्तके वाचावीत, तर शहरी पत्रकारांना ग्रामीण विषयाची ओळख नसती म्हणून ग्रामीण पत्रकारांनी गाव गाड्यांच्या बातम्या वर विशेष लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी केले.
      जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद,कळंब तालुका पत्रकार संघ व सा.साक्षी पावनज्योत यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९५ व्या  जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या सभागृहात दि.२६ जुलै २०२२ रोजी पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.याप्रसंगी मोहेकर गुरुजींच्या कार्याविषयी वेध घेणारा सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.या कार्यशाळेचे उद्घाटन गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
      कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ होते.तर व्यासपीठावर  धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,ज्येष्ठ पत्रकार तथा कविवर्य रवींद्र केसकर,मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत मडके, व्हा.चेअरमन प्रा.डॉ. डी.एस.जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर,सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.डॉ.संजय कांबळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे,विश्वस्त सतिश टोणगे, सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष द.घोडके हे उपस्थित होते .
   यावेळी बोलताना पुढे यशवंतराव भंडारे म्हणाले की, बातमी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते,बातमी म्हणजे घडलेल्या घटनेचे वृत्तांत असतो. तो व्यवस्थित रित्या मांडता आला पाहिजे.शासकीय पत्रकार यांच्या बातम्या करणे कठीण काम आहे.त्याचे शब्द वेगळे असतात,त्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे.
यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,प्रत्येकाने वाचन लिखाण केले पाहिजे.वाचनाने अभ्यास होतो.कारण सर्व बदल होत आहेत.सोशल मीडियामुळे  तत्काळ बातमी वाचावयास मिळते.सोशल मीडियामुळे फायदे जास्त आहेत तसे तोटेही जास्त आहेत.सोशल मीडियामुळे छोट्या छोट्या बातम्यांना न्याय मिळत असल्याचीही त्यांनी मत व्यक्त केले.
या कार्यशाळेत पहिल्या सत्रात बातमी लेखन या विषयावर दै. लोकप्रबोधनचे संपादक चेतन शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले,प्रिंट मीडिया न संपणारी आहे.किती किती छोटा पेपर असला तरी त्याची दखल समाज घेत असतो.दलितावरील अन्यायाच्या बातम्यांना पाहिजे तेवढा न्याय मिळत नाही.
      वृत्तपत्रीय लेखन आणि मराठी भाषा यावर ज्येष्ठ पत्रकार व कविवर्य रवींद्र केसकर यांनी पत्रकारा जवळ मराठीचा शब्द साठा पाहिजे, मराठी शब्दांचे अर्थ माहिती नसताना ते वापरू नयेत.  लिहिताना तारतम्य बाळगून  भाषा वापरावी.वाचकांच्या आवडीचे विषय बदलत चालले  आहेत त्या नुसार  बदल करणे गरजेचे आहे.
कृषीविषयक बातमी व स्तंभ लेखन विषयी दै.लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ यांनी लोकजीवनावर आधारित बातमीदारी असावी,  शेती आणि शेतीतील व्यवसायाशी पत्रकारांनी समस्या मांडण्यासाठी सखोल अभ्यास करावा.सोयाबीनवर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे,फक्त पत्रकारानी गंभीर आणि खंबीर असणे गरजेचे आहे .
      तिसऱ्या सत्रात समाज माध्यमातील पत्रकारिता यावर राजकीय कट्टा चे संपादक प्राचार्य सतीश मातने म्हणाले की,काळानुसार पत्रकारांनी बदल करावा.प्रिंट मीडियावर वाचकांना विश्वास आहे.पण कोरोना पासून वृत्तपत्रे बंद होत आहेत,व वाचकांची संख्या ही कमी होत आहे. कोरोना काळापासून सोशल मीडिया गतिमान झालेला आहे. तर विद्यार्थी व आजची पत्रकारिता यावर सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनीआलेले अनुभव कथन  केले.
    वृत्तपत्रीय कायदे या विषयावर सा.साक्षी पावनज्योतच्या कायदेशीर सल्लागार ॲड.शकुंतला फाटक-सावळे म्हणाल्या की पत्रकारांनी योग्य माहिती घेऊनच बातमी द्यावी. जेणेकरून बातमीमुळे कुणाची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.खोटी बातमी लिहिल्याने पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.हे पत्रकारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.           
  यावेळी कार्यशाळेस शहर व ग्रामीण भागातील पत्रकार,संघटनेचे ८०-८५ प्रसिद्धी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे,सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी तर आभार जय महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments