Subscribe Us

वारसा हक्काच्या जमिनीसाठी तेरखेडा येथील शेतकर्‍याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण


उस्मानाबाद,/ तेरणेचा छावा:-
वारसा हक्कात सातबारावर नोंद घेण्यात यावी याकरिता तेरखेडा येथील शेतकरी शांतलिंग रंगनाथ कुंभार यांनी वारंवार प्रशासनदरबारी हेलपाटे मारुनही न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्यामुळे सोमवार, दि. 20 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील काही अधिकार्‍यांशी संगनमत करुन आपली वारसा हक्काची जमीन हडपण्याचा प्रयत्न झालेला असून या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल होऊनही प्रशासनाकडून दप्तरदिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकरी शांतलिंग कुंभार यांनी केला आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून यात म्हटले आहे की, शांतीलाल चंदूलाल बोराणा, कांतीलाल चंदूलाल बोराणा व माणिक चंदूलाल बोराणा (सर्व रा.तेरखेडा,ता.वाशी, जि.उस्मानाबाद) येथील (कुंभार शेत) दत्तू विठोबा कुंभार यांचे वारसा हक्काची सर्व्हे नं. 369, 370,371  गट नं. 1223, 1224, 1225, 1226, 1227 मधील माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधिताकडे कोणताही पुरावा नसताना 7/12 वारस मुळ मालक बाजूला ठेवून बोगस रेकॉर्ड तयार केले आहे. मूळ मालकाची जमीन भूसंपादन करण्याचा अधिकार नसताना मूळ वारसास वगळून महसुल खाते व मोजणी खाते दोन्ही खात्याशी संगनमत करुन आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

वास्तविक तेरखेडा येथील सर्व्हे नं. 369, 370,371  गट नं. 1223, 1224, 1225, 1226, 1227 ही जमीन दत्तु विठोबा कुंभार यांची असून ही जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 व 211 संपादित झालेली आहे. परंतु शांतीलाल चंदूलाल बोराणा, कांतीलाल चंदूलाल बोराणा व माणिक चंदूलाल बोराणा हे मूळ मालकाचे वारसांना वगळून महसूल व भूसंपादन खात्यातील काही लोकांना हाताशी धरुन या जमिनीचे बोगस रेकॉर्ड तयार करुन आमची वारसा हक्काची जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भूसंपादन विभागाशी महसुल खात्याने जमिनीचे मूळ कागदपत्र तपासणी करुनच संपादीत जमिनीची रक्कम अदा करण्यात यावी, अशी आमची गेल्या दहा वर्षापासून मागणी आहे. या प्रकरणात त्या-त्या वेळी मा.उपजिल्हाधिकारी यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांना बोलावून चौकशी करण्यात आलेली आहे.

कळंब येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी मा.सचिन बारवकर यांनी 07/01/2015 रोजी आमच्या बाजूने निकाल दिलेला होता. या निकालाविरोधात मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे शांतीलाल चंदुलाल बोराणा, कांतीलाल चंदुलाल बोराणा, माणिक चंदुलाल बोराणा यांनी रिट पिटीशन दाखल केले होते. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे रिट पिटीशन काढून घेतले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी मा.सचिन बारवकर यांचा आदेश कायम राहिला. मा.सचिन बारवकर यांनी कलम 1966, 155 नुसार तहसिलदार यांना आदेश पारित केला होता. त्या आदेशाचे पालन न करता अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय व कमिशनर औरंगाबाद, हायकोर्ट औरंगाबाद यांच्या निर्णयाचा तहसिलदार, वाशी यांनी अवमान केला आहे. 
     दि. 23/12/2021 रोजी सक्षम अधिकारी तथा मा.उपविभागीय अधिकारी (भूसंपादन), कळंब यांनी मौजे तेरखेडा येथील जमीन गट नं. 1225 व 1226 मधील अतिरिक्त संपादित क्षेत्राचा मावेजा मालकी हक्काशी संबंधित आवश्यक सर्व पुराव्याची खातरजमा करुन त्यानंतर मावेजा वाटपानंतर उचित निर्णय घेण्यात येईल असा आदेश दिलेला आहे. उपविभागीय अधिकारी, कळंब यांनी मालक व वहिवाटदार म्हणून रंगनाथ दत्तु कुंभार असे नाव दिसून येत आहे असा आदेश दिलेला आहे. तरी सुध्दा आम्हाला न्याय मिळालेला नाही. दि. 29/11/2018 रोजी अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष अधिकार अभिलेख तक्रार निवारण समिती, उस्मानाबाद यांनी मा. उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे प्रकरण पाठविलेले आहे. तरी तारखा न घेता आमचा 7/12, फेरफार नोंदी करुन द्याव्यात, अशी विनंती आम्ही यापूर्वी निवेदनाद्वारे केलेली आहे.
      सदरील जमिनीबाबत त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसल्यामुळे प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरुन आमच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले जात आहेत. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे आम्ही न्यायासाठी आपणाकडे वारंवार निवेदने देऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला. आम्हाला न्याय मिळावा म्हणून 9/6/2022 रोजी सुद्धा आपणांस निवेदन दिलेले होते. परंतु धनदांडग्या व्यक्तींच्या दबावामुळे आमची दखल घेतली जात नाही, हे लक्षात आलेले आहे. म्हणून आपल्या कार्यालयासमोर दि. 20/06/2022 रोजी लाक्षणिक उपोषण करत असून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी शांतलिंग कुंभार यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments