Subscribe Us

हजारो कुटुंबाचे तारणहार ::शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (गुरुजी)



कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची आज 94 जयंती साजरी करण्यात येत आहे. 
  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचा शेतकरी कुटुंबामध्ये 27 जुलै 1927 रोजी बीड जिल्ह्यातील दहिटणा या मामाच्या गावी जन्म झाला. मोहा गावामध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळे गुरुजीनी प्रार्थमिक शिक्षण कळंब येथे पूर्ण केले. त्यानंतरचे उच्च शिक्षण त्याने उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथे पूर्ण केले. त्यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा चालू होता. या लढ्यामध्ये हि गुरुजींनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभाग घेतला.
  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुजी आपल्या मोहा या गावी आले. त्याकाळी त्यांना कुठेही नोकरी लागत असताना त्यांनी नोकरीच्या मागे न लागता. आपल्याला जो शिक्षणासाठी त्रास झाला. हा त्रास आपल्या गावातील, आपल्या भागातील आपल्या, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांना होऊ नये म्हणून गुरुजींनी 1952 साली मोहा येथे ज्ञान प्रसार विद्यालयाची स्थापना करून या ठिकाणी मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय केली. वस्तीगृहात काम करण्यासाठी व काम करणाऱ्या महिलांना देण्यासाठी पैसे कोठून आणायचे म्हणून त्याठिकाणी गुरुजींची  अर्धांगिनी सुमनताई यांनी वसतिगृहातील मुलांना स्वतः स्वयंपाक करून घातला .गुरुजींचे हे कार्य असेच चालू होते. त्यांना हे कार्य करीत असताना अनेक अडचणी आल्या त्या अडचणीला त्याने मोठ्या धैर्याने तोंड दिले व गोरगरिबांच्या मुलांसाठी त्याने कळंब तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील खेड्यामध्ये शाळा चालू केल्या. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे, गोरगरिबांची मुलं त्याकाळी शिक्षण घेऊ लागले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व त्यांच्या अर्धांगिनी सुमनताई मोहेकर यांनी समाजकारण करत असताना फार मोठा त्याग केला. हे आपल्याला विसरता येणार नाही.
  आज या संस्थेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून  याचा कारभार त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.अशोकराव मोहेकर हे पहात आहेत. आज संस्था प्रगतिपथावर आहे. यामध्ये डॉ. अशोकराव मोहेकर सरांची दूरदृष्टी कामास आली आहे. गुरुजींचे स्वप्न होते की याच भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे परंतु काही अडचणीमुळे त्यांना ते करता आलं नाही. गुरुजींचे स्वप्नपूर्ती डॉ. अशोकराव मोहेकर यांनी मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीजची स्थापना करून गूळ पावडर कारखाना उभा केला. मोहेकर मल्टीस्टेट च्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला ते मदत करत आहेत. या दोन्ही संस्थेचा कारभार त्यांचे विश्वासू चेअरमन हनुमंत तात्या मडके हे पहात आहेत.
  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना 1987 साली मला पाहण्याचा व बोलण्याचा योग आला. त्यावेळी माझी दहावी झाली होती. व अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्याच वर्षी येरमाळा येथून सायन्स जुनियर कॉलेज मोहा येथे  ट्रान्सफर झाले होते. या वर्षी ॲडमिशन घेण्यासाठी आमच्या बॅचला शाळेत बोलावलं होतं. त्यावेळेस गुरुजींना पाहण्याचा व बोलण्याचा योग मला 1987 साली आला. आशा थोर महात्म्यांना बोलण्याचा योग त्या काळी आला. हे मी माझं भाग्य समजतो.
  गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कळंब येथील विद्याभवन हायस्कूल कळंब येथे घेण्यात येत होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही. साधेपणाने हे जयंती गेल्या दोन वर्षापासून साजरी करण्यात येत आहे.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी  यांनी आपल्या कुटुंबावर केलेले संस्कार फार मोठे आहेत. या कुटुंबातील एकही सदस्य आज पर्यंत संस्थेतील कुठल्याही कर्मचाऱ्यांशी संस्थाचालक म्हणून वागले नाहीत. संस्था हे एक आमचे कुटुंब आहे. आणि कर्मचारी हे कुटुंबाचे सदस्य आहेत कुटुंबातील सदस्य प्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना डॉ. अशोकराव मोहेकर व त्यांच्या पत्नी अंजलीताई मोहेकर हे वागवत आहेत. दादांचे  स्मित भाष्य, क्षमाशीलता ,दिलेले शब्द पाळणे, कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची काळजी करणे, नम्रता हे गुण दादांकडून व संपूर्ण मोहेकर कुटुंबाकडून घेण्यासारखे आहे. आज गुरुजींनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत व डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्था व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीचे माध्यमातून हजारो कुटुंब आज चांगले जीवन जगताना दिसत आहेत. हे फक्त मोहेकर गुरुजींची पुण्याई आहे.
  शिक्षण संस्था असो वा सहकार असो यामध्ये मोहेकर कुटुंबाने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. परंतु घरातील एक ही व्यक्तीला संस्थेत घेतलं नाही. एवढ्या मोठ्या संस्थेत फक्त एक भावाची मुलगी शिक्षक म्हणून काम करत आहे.  इतर संस्था पाहतो यांचे एक शाखा असेल तर सर्व ओपन जागेवर शिपायापासून ते मुख्याध्यापक का पर्यंत संस्थाचालकाचं  घरचे कर्मचारी असतात .परंतु आमच्या या ज्ञान प्रसारक मंडळामध्ये असं नाही. गुरुजींनी केलेले संस्कार पुढे दादा, भाभी नी  आपल्या कुटुंबावर केले आहेत. आणि त्याने आपल्या कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलं हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचे ठसे देशात व देशाबाहेरही उमटवत आहेत. या कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखा आहे. मोहेकर गुरुजींनी आपल्या पाल्यावर केलेले संस्कार पुढे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. अशोकराव मोहेकर व अंजलीताई मोहेकर भाभी यांनी हे आपल्या पुढच्या पिढीवर केले आहेत. आज ही कुटुंबा बाबतचा कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास दादा व भाभी मातोश्री सुमनताई मोहेकर यांना विश्वासात घेऊनच  घेतात.
 आज त्यांची 94 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे.

संभाजी गिड्डे
मोहा.

Post a Comment

0 Comments