तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
“तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिवकरांच्या अंगलट येत आहे. या अनावश्यक स्पर्धेमुळे गेल्या दोन वर्षांपासून धाराशिव शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना खीळ बसली आहे.”
डॉ.पाटील पुढे म्हणाले की,“राजकारण करण्यासाठी निवडणुका हे योग्य व्यासपीठ आहे. त्या काळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. मात्र, निवडणुका नसताना सर्व लोकप्रतिनिधींचा एकमेव उद्देश ‘धाराशिवचा विकास’ हाच असला पाहिजे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वच पक्ष, नेते आणि प्रतिनिधींनी एकत्र येऊन निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
त्यांनी पुढे आवाहन केले की,धाराशिव जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज आहे. ‘मी मोठा की तू मोठा’ या स्पर्धेत न पडता, विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करणे हीच काळाची मागणी आहे.”
डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी शेवटी अपेक्षा व्यक्त केली की,
“धाराशिवच्या जनतेचा विकास आणि जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वरचा मुद्दा असावा. या भावनेतूनच आपण सर्वांनी जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची नितांत गरज आहे.”
0 Comments