Subscribe Us

प्रवाशांची नेहमीची कुचंबना लोहाऱ्यात बस डेपोची तातडीची गरज.


तेरणेचा छावा/धाराशिव:- 
    लोहारा तालुका असूनही अपुरे बस स्थानक व अपुऱ्या बसमुळे तालुक्यातील नागरिकांना मोठी गैरसोयी निर्माण होत आहे.27 जून 1999 रोजी उमरगा तालुक्याचे विभाजन करून लोहारा हा नवीन तालुका अस्तित्वात आला. आज लोहारा तालुक्यातील 45 गावांत सुमारे 1 लाख 60 हजार लोकसंख्या असून 1 लाख 10 हजार मतदार आहेत. तालुका निर्मितीनंतर अनेक प्रशासकीय कार्यालये येथे आली असली तरी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा तालुका अद्याप पुरेशा सुविधांपासून वंचित आहे.
     एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे असताना आमदार निधी व महामंडळाकडून मिळून तब्बल 85 लाख रुपयांचा खर्च करून बसस्थानक उभारले गेले. मात्र हे स्थानक अपुरे ठरत असून प्रवाशांना आवश्यक सुविधा नाहीत.
       लोहारा तालुका हा तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना जोडणारा दुवा आहे. शेजारीच लातूरसारखी मोठी बाजारपेठ असल्याने व्यापार, शिक्षण व उद्योगधंद्यांसाठी विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ कायम असते. महिलाही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तरीसुद्धा प्रवाशांना आजही योग्य सुविधा नसल्याने त्यांची नेहमीच कुचंबना होते.
     सध्या लोहाऱ्यात बसस्थानक असले तरी बस डेपो नाही. त्यामुळे येथील प्रवासी बाहेरच्या डिपोंवर अवलंबून राहतात. लोहाऱ्यात प्रशस्त चार एकर जागा उपलब्ध असून येथे बस डेपो उभारल्यास प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक मागणीनुसार येथे किमान 50 बसांची सोय करून डेपो उभारणे गरजेचे आहे.
    लोहारा तालुक्याचा वाढता प्रवासी ताण लक्षात घेता परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून येथे बस डेपो उभारावा,अशी मागणी मंत्री महोदय यांना धाराशिव दौऱ्यात केली..

Post a Comment

0 Comments