छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचे सत्कार्य शिंदे, होळकर, गायकवाड, घोरपडे, निंबाळकर या सरदारांनी केले यातील महत्त्वपूर्ण व आवर्जून घ्यावे असे नाव म्हणजे इंदूरचे होळकर होय. होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर असून मल्हाररावांनी राज्याची मुहूर्त मेढ केली. तर त्यांच्या सूनबाई अहिल्याबाई होळकर यांनी कल्याणकारी राज्यात रूपांतर केले त्या शूरवीर, थोर अशा राज्यकर्त्या व समाजसुधारक होत्या, अशा थोर नारी रत्नाचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. आईचे नाव सुशिलाबाई तर वडील माणकोजी शिंदे होते व ते गावचे पाटील होते तर आई अध्यात्मिक, संस्कारशील गृहिणी होती. अहिल्याबाईंचा विवाह आठव्या वर्षी मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला अहिल्याबाई इंदूरला आल्या त्यांच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था सासरे मल्हारराव होळकर यांनी केली अहिल्याबाई सर्व गुणसंपन्न अशा राज्यकर्त्या बनल्या. प्रभावीपणे 29 वर्ष राज्याचा राज्यकारभार केला देव, देश, धर्म, व संस्कृतीसाठी संपूर्ण जीवन व्यतित केले. त्या न्यायप्रिय आदर्श प्रशासक व समाजसुधारक होत्या त्या निपक्षपातीपणे व विनाविलंबन न्याय देण्यात प्रसिद्ध होत्या न्याय देताना त्या लहान मोठा किंवा लांबचा जवळचा असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देत असत. त्यांनी न्याय दिल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक दिलेल्या न्यायाचा स्वीकार करून आनंदाने घरी जात असत. शिवाय त्यांच्या न्याय बिनतोड असे. एकदा त्यांनी साक्षात त्यांचे पती खंडेराव होळकर यांना शिक्षा ठोठावली खंडेरावांनी राज्याच्या तिजोरीतील काही पैसे मागितले होते पण, अहिल्याबाईंनी त्यांनी पैसे दिले नाहीत. म्हणून, खंडेरावांनी हिशोबाच्या वह्या कोपऱ्यात भिरकावून दिल्या, अहिल्याबाई कठोर झाल्या त्यांनी पतीला २५ मोहरा दंडाची शिक्षा ठोटावली आणि या शिक्षेची कडक अंमलबजावणी करण्यास गंगोबा चंद्रचूड यांना सांगितले व दंड वसूल केला. अशा त्या निपक्षपातीपणे न्याय द्यायच्या. त्या काळात अनेक निपुत्रिक स्त्रियांना मूल दत्तक घेताना सरदार व कामविसदार पैशाची मागणी करत असत सिरोजच्या खेमचंद सावकाराच्या पत्नीला दत्तक घेताना कामविसदाराने पैशाची मागणी केली ती महिला अहिल्याबाईंकडे न्याय मागण्यासाठी आली त्या स्त्रीला अहिल्याबाईंनी योग्य न्याय दिला व कामविसदाराची बदली करुन कडक ताशेरे ओढले, न्याय देताना त्या अगदी पती-पुत्राचा सुद्धा मुलाहिजा बाळगत नसत, यावरून आपणाला त्यांच्या न्यायप्रियतेचे आणि निपक्षपातीपणाचे दर्शन होते. शिवाय इतर राजे, महाराजे यांच्या कुटुंबातील तंटे, बखेडे सोडवण्यासाठी देखील अहिल्याबाईंकडे येत असत, सर्वसामान्य जनतेला सुद्धा न्याय निपक्षपातीपणे व विनाविलंब मिळत असे यातून त्यांची न्यायप्रियाता स्पष्ट होते.
राज्याचा कारभार त्या अतिशय कासोशीने करत एक एक रुपयाचा हिशोब काळजीपूर्वक ठेवत असत मल्हारराव होळकर यांच्या निधन झाले तेव्हा त्यांची खाजगी जहागिरीत सोळा कोटीचा खजिना होता. त्या ऐशारामत जीवन जगू शकत होत्या शिवाय राज्याच्या उत्पन्नातील पैशाचा सुद्धा त्या कसाही वापर करू शकत होत्या, पण त्यांनी एक रुपयाची देखील नासाडी केली नाही त्या म्हणायच्या मला एक एक पैशाचा हिशोब देवाला द्यावा लागेल, त्यांचे नैतिक अधिष्ठान व्यापक होते हिशोबात एक रुपयाची देखील चूक नसायची तसा चूक करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या तत्काळ लक्षात यायचे व ती चूक तत्काळ लक्षात आणून द्यायच्या यावरून त्यांच्यतील कुशल प्रशासक दिसतो.
राज्याच्या प्रगतीसाठी त्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत अखंडपणे कार्य करत असत हिशोब, न्यायदान, पत्रव्यवहार, सैन्य भरती, शस्त्र निर्मिती, दारूगोळा निर्मिती, शस्त्र व दारू पुरवठा, सैन्य पुरवठा हे कार्य अखंड चालू असे. मल्हारराव होळकर यांच्याशी त्या पत्राच्या माध्यमातून सतत संपर्कात असायच्या मल्हारराव होळकार यांचे मार्गदर्शन घायच्या, पानिपतच्या युद्धाच्या वेळी ग्वाल्हेरला शिंदेच्या तोफखान्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतः अहिल्याबाई होत्या त्यांनी प्रभावीपणे त्या तोफखान्याची व्यवस्था पाहिली होती, व पानिपतावर लढायला गेलेल्या मराठ्यांना अन्न व युद्ध सामुग्री पुरवण्याचे काम केले, त्यांना मुलकी आणि लष्करी कारभराचे इत्यंभूत ज्ञान होते मल्हारराव होळकर हे राज्यकारभाराची जबाबदारी पूर्णपणे अहिल्याबाईंवर टाकून मोहिमेवर जात असत कारण त्यांना अहिल्याबाईंवर पूर्णपणे विश्वास होता, त्यामुळेच मल्हारराव होळकर म्हणत, "आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या जीवावर मार्तंडानेच हे रत्न आम्हास दिले."अशी त्यांची भावना होती.
शिवाय त्यांच्या राज्याचे अंतर्गत व्यवस्था ही खूप प्रभावी होती ग्राम स्तरापासून ते केंद्रस्तरापर्यंत प्रभावी शासन व न्याययंत्रणा होती. ब्रिटिश इतिहासकार सर जॉन मालकाम हे म्हणतात की, "अहिल्याबाईची राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावे इतकी आदर्श व नमुने दार होती अहिल्याबाईंच्या साऱ्या मर्यादा लक्षात घेऊन असे वाटते की अहिल्याबाई ही एक शुद्ध मनाची सात्त्विक विचाराची आदर्श राज्यकर्ती होती," असे उदगार काढले आहेत तर इंग्रजी लेखक लॉरेन्सने अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी कॅथरीन इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे कारण अहिल्याबाईंचे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि व्यक्तित्व हे खूप प्रभावी होते. शिवाय अहिल्याबाई या एक कुशल राजनितिज्ञ, रणनितिज्ञ, मुत्सद्दी, थोर विचारवंत, शूरवीर, लढवय्या व न्यायवृतीच्या होत्या आधुनिक लोकशाहीतील समानता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, न्याय, बंधुता आदी तत्त्वांचा अंगीकार त्यांनी आठराव्या शतकात केला होता याशिवाय समाज सुधारण्याच्या अनुषंगाने त्यांनी दारूबंदी, हुंडाबंदी सारखे विविध कायदे केले, दत्तक विधानाला मंजुरी दिली, सतीबंदी त्यांना करायची होती. पण, जनभावनेमुळे त्या करू शकल्या नाहीत परंतु, सतीबंदी चळवळीची सुरुवात अहिल्याबाईंनी केली,
त्या प्रजेची स्वतःच्या लेकरासारखी काळजी घेत असत प्रजेच्या हितासाठी, प्रगतीसाठी त्या विविध योजना आणत असत शेतकऱ्यांना उत्पन्नानुसार कर लावण्याचा त्यांचा निर्णय खूप महत्त्वाचा होता त्यानुसार उत्पन्न कमी झाले तर कर कमी केला जात असे, शिवाय त्या शेतकऱ्यांना बी-बियाणे देत असत, फळझाड लावण्यासाठी प्रेरणा देत असत, शेती वहीत करण्यासाठी देत असत, भिल्ल समजाच्या लोकांना कर घेण्याची मुभा देऊन त्यांना पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावून दिला तोच हा 'भिलकावडी' कर होय. विविध सुधारणेच्या माध्यमातून लोकांना सुखी केले, यात्रेकरूना लुटारू लुटत असत त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी जागोजागी चौक्या बसवल्या आपल्या हद्दीतून पलीकडे तो यात्रेकरु, प्रवासी सुखरूप जाण्याची जबाबदारी तेथील चौकीदारांवर असे, शिवाय वाटेत अनेक अन्नछात्र निर्माण करून प्रजेला अन्न दिले, पाणपोई चालू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली अनेक धर्मशाळा उघडल्या. त्यामुळे प्रवासी, यात्रेकरुंना निवारा मिळाला शिवाय घाट, तलाव, कुंड, रस्ते, मंदिरे, मशिदी, बांधून लोकांना अन्न, पाणी, रोजगार दिला, लोकांना अध्यात्मिक व नैतिक मार्गाला लावून संस्कृती संवर्धनचे मोलाचे काम केले, शिवाय इंदोर, महेश्वर येथे विविध बाजारपेठा निर्माण केल्या महेश्वर येथे महेश्वरी साडीचा ब्रँड निर्माण करून लोकांना रोजगार मिळवून दिला, अनेक रस्ते बांधून दळणवळणाची सोय केली शिवाय रस्त्याच्या दूतर्फ झाडे लावून पर्यावरण रक्षण केले, शेतात व रस्त्याच्या कडेने झाडे लावताना आंबा, चिंच, वड, पिंपळ, औंदुबर अशी झाडे लावली जात असत जेणेकरून जमिनीतील पाणी वाढेल, पर्यवरण सुधारेल व फळे खायला मिळतील हा हेतू होता. शासन म्हणजे भोग नसून तो एक महान योग् आहे अशी त्यांची धारणा होती.
अहिल्याबाईंनी प्रजेच्या सुखासाठी स्वतःची मुलगी पणाला लावली प्रजेचे रक्षण लेकरासारखे त्या करत असत नेमाड प्रांतात चोर दरोडेखोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाला होता यात्रेकरुंना प्रवाशांना हे चोर दरोडेखोर लुटत असत त्यांना मारहाण करत असत अशावेळी अहिल्याबाईंकडे सतत तक्रार येत असे तेव्हा त्यांनी दरबार भरवला व त्यांनी सर्व सरदारांना, प्रतिष्ठित नागरिकांना बोलावले व घोषणा केली की, जो कोणी वीर पुरुष चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करील त्याचे लग्न कन्या मुक्ताबाईशी लावून देऊ असे जाहीर केले. हा पण भिल्ल समाजातील यशवंतराव फणसे नावाच्या विराने स्वीकारला व चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केला अहिल्यादेवींनी खुशीने मोठ्या थाटामाटात कन्या मुक्ताबाईचे लग्न यशवंतराव फणसे यांच्याशी लावून दिले. हाच स्वमर्जीने झालेला पहिला आंतरजातीय विवाह होय, हे लग्न करत असताना कसलाही जातीपातीचा विचार न करता शौर्याचा विचार केला व जातीपतीची भक्कम उतरंड आठराव्या शतकातच ढासळून दिली व जातीला मूठ माती देण्याचे पुरोगामी कार्य केले. यातून त्यांचा आधुनिक व व्यापक दृष्टिकोन स्पष्ट होतो आज शासन आंतरजातीय विवाहला प्रोत्साहन देत आहे ते कार्य त्यांनी 18 व्या शतकात स्वकृतीतून दाखवून दिले हे एक समाज सुधारणेच्या दृष्टीने एक खूप मोठे पाऊल म्हणावे लागेल. शिवाय त्या काळात मुलीचे लग्न लहान वयात म्हणजे दहा ते बारा वर्षात होत असे पण अहिल्याबाईंनी मुक्ताबाईचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षे करून एक आदर्श निर्माण केला, असून आता शासनाने मुलीचे लग्नाचे वय अठराच केले आहे यातून त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. म्हणूनच अहिल्याबाईंचे कार्य व विचार हे आदर्श ठरतात. त्यांना त्यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
-: लेखक :-
गाढवे श्रीकांत विक्रम
शिक्षक, संशोधक व होळकर शाहीचे अभ्यासक
रा.शेलगाव दि. ता.कळंब जि. धाराशिव मो. नं. ९७६३५७९६८२
0 Comments