Subscribe Us

खा राजेनिंबाळकर व अर्चनाताई पाटील या दोघांनाही चारीमुंड्या चित्त करणार - भाऊसाहेब आंधळकर


ॲड  आंबेडकरांनी टाकलेला विश्वास सार्थक करुन दाखविणार
धाराशिव /तेरणेचा छावा:- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व अर्चनाताई पाटील या घराण्यात पारंपारिक युद्ध भांडण सुरू आहे. या भांडणामध्ये क्राईम ब्रँच पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मला यावे लागलेले आहे. जनतेने मला स्विकारलेले असून जनतेला परिवर्तन व बदल पाहिजे. नुसते टीव्ही व सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी प्रसारित करायचे अन् अंगापेक्षा भोंगा जास्त करायचा हा सगळा अनुभव नागरिकांनी घेतलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. विशेष म्हणजे मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून ही निवडणूक युवकांनी हातात घेतल्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व अर्चनाताई पाटील या दोघांच्याही चारीमुंड्या चित्त करून माझा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी दि.१८ एप्रिल रोजी व्यक्त केला.
उस्मानाबाद लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी बी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष प्रवीण बागुल अनुराधा लोखंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आंधळकर म्हणाले की, १३ वर्षे मी शिवसेनेचा भगवा हाती घेऊन आंदोलन केले. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. परंतू मला शिवसेनेने न्याय दिला नाही. मात्र ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिली हे माझे सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत चुलता - पुतण्या, भाऊ - भाऊ व आता दिर वहिणी अशी निवडणूक लढले जात आहे. मात्र यामध्ये कुठेतरी छेद देण्यासाठी या ठिकाणी वंचित चा आवाज उठविण्यासाठी आम्ही रण मैदानामध्ये आलेलो आहोत. एबी फॉर्म सहित अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायचीच आहे असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघांमध्ये जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून ॲड आंबेडकरांनी बहुजनाचा आवाज म्हणून सर्व समाजातील वंचिताला न्याय देण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातल्या सामाजिक व शैक्षणिक वंचित असतील त्यांना न्याय देण्यासाठी हा तिसरा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा केवळ दलितांचा पक्ष नसून सगळ्या समाजाचा सर्व समावेशक पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. तर जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्योगांचे प्रकल्प आणायचे असून मुलांना नोकरी उपलब्ध करून देण्यासह मेडिकल हब झाला पाहिजे, २१ टीएमसी पाणी आले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजकारण म्हटलं की सर्व समीकरण पहावी लागतात आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्यावेळी आंबेडकरांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला व उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात साडेपाच लाख लिंगायत, दलित व ओबीसी बांधव असून मी निश्चितपणे निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बार्शीची ७० टक्के जनता माझ्या पाठीशी
बार्शी तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ७० टक्के आहे. कारण या निवडणुकीमध्ये एकही माजी आमदार उभा राहिलेला नाही. मागच्या वेळी माजी आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत यांना मी आशिर्वाद दिला आहे. तसेच खासदार राजेनिंबाळकर यांनीही मी आशिर्वाद दिला असल्यामुळे त्या सर्वांनी मला आशिर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे गेल्या तेरा वर्षांत स्वप्न पाहू शकलो नाही. मात्र ॲड आंबेडकरांनी मला आमदार नको खासदार व्हावे यासाठी न्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तर गरिबांनी आयुष्यभर पिढ्यान् पिढ्या घोंगडीच उचलत राहायची का ? असा प्रश्न उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडी हा देशात तिसरा पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments