Subscribe Us

आयुष इन्स्टिटयूटच्या युवक महोत्सवात तरुणाईचा नशामुक्त भारतचा हुंकार!


राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राचा उपक्रम

पथनाट्य, वक्तृत्व, चित्रकला, सामूहिक नृत्य स्पर्धेतून दिला  व्यसनमुक्तीचा संदेश

राज्यभरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बार्शी/ तेरणेचा छावा:-
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विकेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियानांतर्गत आयोजित  व्यसनमुक्ती युवक महोत्सवात राज्यभरातील शाळा, महाविद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य, वक्तृत्व, चित्रकला, सामूहिक नृत्य स्पर्धेतून व्यसनमुक्ती जनजागृती करत नाशामुक्त भारताचा संदेश दिला. निमित्त होते आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती युवक महोत्सव २०२३ चे.
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील जामगाव (ता.) बार्शी येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रात गुरुवार, १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती युवक महोत्सवाचे उदघाटन बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व सुलाखे हायस्कुलचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर यांच्या हस्ते झाले. मंचावर लाईफलाईन वेल्फेअर सोसायटीचे सीईओ डॉ. संदीप तांबारे, समुपदेशक सौ. मृणालिनी मोरे, यश मेडिकल फाउंडेशनच्या डॉ.सौ. पल्लवी तांबारे, समुपदेशक नितीन आळंदकर, समाजसेवक पंकज आवटे, विजय आवटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विकेकानंद, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न - डॉ. संदीप तांबारे
प्रास्ताविकात डॉ. संदीप तांबारे यांनी व्यसनमुक्ती युवक महोत्सवाचे आयोजन करण्यामागील उद्देश विशद केला. व्यसनाधीनतेमुळे समाजाची वाईट अवस्था झाली आहे. वाढत चाललेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी व नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आयुष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात तब्बल १ लाख २७ हजार लोक व्यसनाच्या आहारी गेलेले असून ८० हजार जणांना उपचाराची गरज आहे, ही चिंताजनक बाब आहे. यापूर्वी बार्शी तालुक्यात व्यसनमुक्त गाव स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.  यावर्षीही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. तांबारे यांनी यावेळी केली. व्यसनमुक्तीच्या कार्यात सतत सहकार्य लाभत असल्याबद्दल बार्शीचे डीवायएसपी जालिंदर नालकुल यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. संदीप तांबारे यांच्यामुळे क्राईमरेट रोखण्यास मदत - डीवायएसपी नालकुल
डीवायएसपी जालिंदर नालकुल यांनी आपल्या भाषणात डॉ. तांबारे यांनी आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुरु केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यामुळे व्यसनाधीनतेमुळे वाढणारे गुन्हे कमी होऊन क्राईमरेट रोखण्यास मोठी मदत झाली असल्याचे गौरवोद्गार काढले. संगतीमुळे किंवा व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला पैसे कमी पडले की, चोरी, लूटमार यासारखे गुन्हे घडतात. परंतु अशा गुन्ह्यात झालेली घट म्हणजे  व्यसनमुक्ती केंद्राचे यशच असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीवनाकडे सकारात्मकतेने पहा -  मुख्याध्यापक हिरोळीकर
एका मोठ्या अपघातानंतर मीही खचून गेलो, परंतु त्या धक्क्यातून मोठ्या उमेदीने सावरलो. प्रत्येकाने जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य ते शक्य होऊ शकते, असे सांगून अंधाराची खंत तू कशाला करशील, गा प्रकाशगीत असा संदेश त्यांनी उपस्थिताना दिला.

भारत हा युवाशक्तीचा देश - आळंदकर
भारत हा युवा शक्तीचा देश असल्याचे समुपदेशक नितीन आळंदकर यांनी सांगितले. तर उच्चभ्रू समाजातील महिला देखील आता व्यसनाच्या विळख्यात अडकत असून त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंदे सुरु करावी लागणे ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी ग. दि. माडगूळकर यांची व्यसनावरील विडंबनात्मक रचना सादर करून उपस्थिताना मनमुराद हसविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती जाधव, डॉ. तनुजा चिकणे यांनी केले. उदघाटन सत्रानंतर वक्तृत्व, चित्रकला, पथनाट्य, सामूहिक नृत्य स्पर्धाना सुरुवात झाली. कार्यक्रमास विविध शाळा, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, परिवर्तनवादी युवक, परिसरातील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments