उस्मानाबाद/तेरणेचा छावा :-धाराशिव साखर कारखाना चोराखळी येथे राज्यात पहिला ऑक्सीजन निर्मिती पायलेट प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे . या प्रोजेक्टला पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे व सर्व यंत्रणांनी या कामी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश सोमवार (दि. 29 एप्रिल) रोजी कोरोना आढावा बैठकीत दिले.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की धाराशिव साखर कारखाना लिमिटेड चोराखळी हा राज्यात पहिला कारखाना आहे जो ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट उभारत आहे. येथे इथेलॉन प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झालेला आहे. या प्रकल्पात आणखी थोडे कमी-अधिक तंत्रज्ञान व मशिनरी वापरून ऑक्सिजन निर्मितीचे काम मागील 10 दिवसापासून चालू आहे. येत्या आठ दिवसात या प्रकल्पातून दररोज 15 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील हॉस्पिटलला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाची पूर्ण माहिती व काम कसे जलदगतीने पूर्ण होईल यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी पालकमंत्र्यांनी पूर्ण सहकार्य व लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच अभिजीत पाटील यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानले .
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर यांना या प्रोजेक्टमधील येणार्या अडचणी तात्काळ दूर करून लवकरात लवकर तात्काळ प्रकल्प चालू होईल याकडे जातीने लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील ,आमदार ज्ञानराज चौगुले ,नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments