२०० विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डद्वारे पाठवले निवेदन; जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांचे वेधणार लक्ष
तेरणेचा छावा | दहिफळ:-
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहिफळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. शाळेकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नावे पोस्टकार्डद्वारे निवेदन पाठवले आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेसमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून अपघाताची भीती कायम आहे. याच रस्त्यावरून ग्रामस्थांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली होती. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांनी थेट प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोस्टकार्ड मोहीम राबवली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नावे पत्र लिहून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासन या मागणीची गंभीर दखल घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष; आता आंदोलन तीव्र होणार
प्रशांत भातलवंडे (दहिफळ) म्हणाले, "शाळेच्या रस्त्याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदने दिली. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. हा विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मुख्य रस्ता असून पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत पोस्टकार्डद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. आता प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती
दशरथ बाराते, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग, कळंब म्हणाले, "दहिफळ–परतापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे इस्टिमेट धाराशिव कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. सध्या पावसाळा असल्याने डांबराने खड्डे बुजविणे शक्य नाही. मात्र अपघात टाळण्यासाठी लवकरच घोड्या मुरूम अथवा खडी टाकून खड्डे तात्पुरते भरून काढण्यात येतील."
0 Comments