तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावातील रस्ता व पुलाच्या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाने साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी ₹२ कोटी ९० लाख ५८ हजार खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली असून, ग्रामविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे साडे सांगवी येथील रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाला भेट देऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता.
या मंजुरीमुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व दैनंदिन प्रवाशांना वर्षभर सुरक्षित व अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होऊन गावाचा संपर्क अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, साडे सांगवीला भेटीदरम्यान ग्रामस्थांना रस्ता व पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. शासनाच्या प्रशासकीय मान्यतेमुळे ते आश्वासन पूर्ण होत असल्याचा आनंद असून, "जनतेला दिलेला शब्द पाळणे हीच आमची कार्यपद्धती आहे," असे त्यांनी म्हटले.
या कामास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले
0 Comments