तेरणेचा छावा/धाराशिव:– येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर परिसरात शनिवार (दि.9 ऑगस्ट) रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक देवदर्शनासाठी जमा झाले होते.श्री येडेश्वरी मंदिरावर झालेल्या गर्दीत गावगुंडांनी मोठा गोंधळ घालून दहशत माजवली. या घटनेत मंदिरातील सुरक्षा रक्षकाला तसेच काही भाविकांना मारहाण करण्यात आली असून, शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक प्रशांत बापू साळुंखे यांचा ६ वर्षीय मुलगाही जखमी झाला आहे. हाणामारी पोलीसांच्या उपस्थितीत झाली असून पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप भाविकातून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने काही युवकांना हटकल्यामुळे संतापलेल्या ४ ते ५ जणांनी रक्षकाला जबर मारहाण केली. त्यानंतर २० ते २५ जणांनी एकत्र येऊन मंदिर परिसरात दहशत निर्माण केली. या दरम्यान, इतर भाविकांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशांत बापू साळुंखे यांनी सांगितले की, “आज आम्ही पूर्ण कुटुंब दर्शनासाठी गेलो होतो. गोंधळाच्या वेळी माझा मुलगा मार्तंड याच्या पायावर मार लागून तो जखमी झाला."
नारळी पौर्णिमेनिमित्त आज येडेश्वरी डोंगरावर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र, गावगुंडांच्या या गोंधळामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मारहाण झालेला सुरक्षा रक्षक भयभीत झाला असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
येरमाळा परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडत चालल्याचे मागील काही घटनावरून दिसून येत आहे. परिसरात रोज काही ना काही घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.
0 Comments