तेरणेचा छावा/धाराशिव:-
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज सकाळी 9 वाजता व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण लक्षात घेऊन दारू, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, चरस, ब्राऊन शुगर, पेट्रोल, सोल्युशन, ड्रग्स इत्यादी घातक पदार्थांपासून मुक्त समाज घडविण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून पोहोचविण्यात आला.
या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालये, व्यसनमुक्ती संस्था तसेच शेकडो स्वयंसेवी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथील कर्मचारी व रुग्ण मित्रांनी व्यसनमुक्तीचे संदेश देणारे बॅनर, पोस्टर्स आणि फलक हातात घेऊन, व्यसन सोडा संसार उठ युवका जागा हो व्यसनमुक्तीचा धागा हो, व्यसनाचा पाश करी संसाराचा नाश, नशा मुक्त भारत सशक्त भारत आशा विविध प्रकारच्या घोषणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून झाली. शहरातील मुख्य मार्गाने चालत छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे रॅलीचा समारोप झाला. संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांनी व व्यसनमुक्तीच्या संदेशांनी वातावरण दुमदुमले.
या रॅलीसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर ता. आमदार . राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे,आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव चे ए .पी. आय म्हात्रे , येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणपतसिंग परदेशी, कौटुंबिक समुपदेशिका प्रियंका शिंदे, अतुल कोल्हे आणि केंद्रातील रुग्णमित्र उपस्थित होते.
रॅलीत 3,000 पेक्षा अधिक शासकीय, प्रशासकीय, राजकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक सहभागी झाले. समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन ही रॅली यशस्वी केली.
0 Comments