दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर यांची नियुक्ती.
तेरणेचा छावा/धाराशिव:- महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी धोरणांतर्गत दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नूतन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा थाटात उद्घाटन समारंभ गुरुवार (दि.1 मे) रोजी संपन्न झाला.
या महत्त्वपूर्ण कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.तसेच नूतन दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर यांच्याकडे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाची सूत्रे अधिकृतपणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रसंगी सुपुर्द केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण कार्यालय स्थापन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.अप्पर मुख्य सचिव श्री अनिल डीगीकर तसेच उपसचिव सुनंदा घड्याळे अवरसचिव श्रीअधिकराव बुधे यांनी शंभर दिवस कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पहिल्या टप्प्यात राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय एक मे पासून सुरू करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे नव्याने सुरू झालेले हे कार्यालय दिव्यांगांना शासकीय योजना, अर्थसहाय्य आणि इतर आवश्यक सेवा सुलभपणे उपलब्ध करून देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "दिव्यांग बांधवांना विकासाच्या समान संधी मिळवून देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ त्वरित मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल."
या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल, अशी आशा व्यक्त केली.
एकंदरीत, धाराशिव येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा शुभारंभ दिव्यांगांसाठी एक आशेचा किरण घेऊन आला असून, यामुळे त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळेल.
0 Comments