तेरणेचा छावा/धाराशिव:– जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल करत पक्ष नेतृत्वाने उमेश राजेनिंबाळकर यांची धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
उमेश राजेनिंबाळकर हे धाराशिव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे काँग्रेसचे एकमेव सदस्य असून गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असून ग्रामीण भागातील पक्षबांधणी, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना उमेश राजेनिंबाळकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी व सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या साथीने काम करू,”असे सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments