Subscribe Us

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणतीही अडचण येणार नाही.पालकमंत्री प्रताप सरनाईक


धाराशिव/तेरणेचा छावा:-
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस ऑनलाईन उपस्थित राहून धाराशिव जिल्ह्यातील विविध कृषी विषयक प्रलंबित बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले.
       हवामान बदल, एलनिनोचा प्रभाव, कमी पर्जन्यमानाची शक्यता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अस्थिरता या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची तयारी अधिक सक्षम आणि समन्वयात्मक पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
      बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२६ साठी बियाणे, खते, पीककर्ज, सिंचन, हवामान अंदाज, पीकविमा, कृषी निविष्ठा उपलब्धता, शेतकरी कल्याणकारी योजना तसेच कृषी विस्तार कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
       धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप हंगामात ६,५५,००६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी तब्बल ४,७३,००० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी खतांचा पुरेसा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असून डीएपी खताची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याची बाब बैठकीत मांडली. आवश्यक १९,२०० मे.टन डीएपी खताच्या तुलनेत केवळ १०,०८२ मे.टन पुरवठा झालेला असून उर्वरित खताचा पुरवठा तत्काळ करण्याची मागणी करण्यात आली.
     तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध योजनांचे प्रलंबित अनुदान आणि निधी याबाबतही पाठपुरावा करण्यात आला. 
    एलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे जिल्ह्यातील फळबागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित केले. महाडीबीटी योजनेंतर्गत लाभ मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेता विशेष बाब म्हणून ५५० शेततळे खोदकाम व अस्तरीकरणासाठी ₹८.२५ कोटी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
      धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Post a Comment

0 Comments