हजारो रुपयांचा खर्च मातीत, एकरात पाऊण क्विंटलही नाही; शेतकरी वसंत ताकमोगेंसह शिवारात सुन्न शांतता, आता तरी १००% पीक विमा मिळणार का?
तेरणेचा छावा/सापनाई:-
चार महिने उन्हा-पावसात काळ्या आईची जीवापाड सेवा केली, आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा केली, उसनवारी आणि कर्ज काढून बियाणे-खते जमिनीत गाडली... पण अखेर हातात काय आले? तर अवघी एक पिशवी सोयाबीन! धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सापनाई शिवारात पार पडलेल्या अधिकृत ‘पीक कापणी प्रयोगा’ने बळीराजाच्या डोळ्यांत थेट पाणी आणले आहे. शेतकरी वसंत ताकमोगे यांच्या शेतात जेव्हा महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष प्रत्यक्ष पीक कापणी झाली, तेव्हा अर्ध्या गुंठ्यामध्ये अवघे ९२० ग्रॅम सोयाबीन भरले. हा आकडा डिजिटल काट्यावर झळकताच उपस्थित अधिकारीही क्षणभर स्तब्ध झाले, तर उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
आकडेमोड नव्हे, ही संसाराची झालेली राखरांगोळी!
शासकीय नियमांनुसार अर्धा गुंठा क्षेत्रातील पिकाची कापणी, झोडपणी आणि मळणी करून सर्वांच्या देखत डिजिटल काट्यावर वजन मोजण्यात आले:
अर्ध्या गुंठ्यात उत्पादन अवघे ९२० ग्रॅम एका गुंठ्यात उत्पादन १.८४ किलोग्रॅम संपूर्ण एकरात (४० गुंठे): केवळ ७३.६ किलोग्रॅम (पाऊण क्विंटलही नाही!) हेक्टरी उत्पादन जेमतेम १.८४ क्विंटल
ज्या शेतातून एकरी किमान ७ ते १० क्विंटल सोयाबीनची रास घरात येणे अपेक्षित होते, तिथे संपूर्ण एकरभर राबून अवघे ७३ किलो धान्य हाती येत असेल, तर शेतकऱ्याने वर्षभर जगायचे कसे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे? ही केवळ पीक कापणीची कोरडी आकडेवारी नसून एका घाम गाळणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नांची झालेली होळी आहे.
मळणीचा खर्चही फिटेना; उत्पादन खर्च तर कोसो दूर
पेरणी, नांगरणी, खते, महागडी कीटकनाशके आणि मजुरी असा एकरी किमान १५ ते २० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने अंगावर घेतला होता. मात्र, शेतातून निघालेले अवघे पाऊण क्विंटल सोयाबीन विकून मळणीयंत्राचे (थ्रेशर) भाडे आणि मजुरांची मजुरी देणेही शक्य राहिलेले नाही. पावसाचा प्रदीर्घ खंड आणि लहरी हवामानाने पिकाचा अक्षरशः घात केला असून, बळीराजा पुन्हा एकदा कर्जाच्या न फिटणाऱ्या विळख्यात ढकलला गेला आहे.
अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत उघड झाले विदारक सत्य
सापनाई शिवारात हा पंचनामा शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी गायकवाड, कृषी विभागाचे भारत मोटे, विमा कंपनीचे प्रतिनिधी नवले,गावचे पोलीस पाटील धनंजय ताकमोगे, प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील, गोपाळ डोके यांच्यासह स्वतः शेतमालक वसंत ताकमोगे आणि स्थानिक ग्रामस्थ शेतात उपस्थित होते. स्वतःच्याच शेतात बियाण्याइतकेही पीक हाती लागत नसल्याचे पाहून शेतकरी वसंत ताकमोगे यांच्या चेहऱ्यावर पसरलेली हतबलता आणि शून्यात गेलेल्या नजरा उपस्थितांचे मन हेलावून टाकत होत्या.
कागदी घोडे थांबवा, थेट १००% पीक विमा मंजूर करा!
"आमच्या नुकसानीचा यापेक्षा मोठा आणि जिवंत पुरावा सरकारला आणखी काय हवा? अधिकाऱ्यांच्या समोरच डिजिटल काट्यावर आमचे मरण तोलले गेले आहे,"* असा संतप्त व आर्त टाहो सापनाई परिसरातील शेतकऱ्यांनी फोडला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक नुकसान प्रत्यक्ष प्रयोगात सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता विमा कंपन्यांनी तांत्रिक त्रुटी किंवा ॲपच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक न करता, सापनाई मंडळातील शेतकऱ्यांना तातडीने १०० टक्के पीक विमा भरपाई वर्ग करून बळीराजाला जीवनदान द्यावे, अशी एकमुखी मागणी संपूर्ण पंचक्रोशीतून होत आहे.
0 Comments