Subscribe Us

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुडघाभर पाण्यात उतरुन केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी



येत्या तीन दिवसात पिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे प्रशासनला दिले आदेश.
तेरणेचा/छावा:-
      धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेतली. यावेळी येत्या ३ दिवसांमध्ये पिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
      गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, पुण्यासह काही जिल्हे आणि शहरं वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांमुळे नद्यांना पूराची स्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात ही जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे तेरणा व मांजरा नदीला पूर आला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
     अतिवृष्ट्रीची तात्काळ दखल घेऊन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. यामध्ये प्रामुख्याने वाशी तालुक्यातील घोडकी या गावामध्ये  प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. खोंदला ता.कळंब या गावात अतिवृष्टी पुरामुळे वाहून गेलेल्या शेतकरी कुटुंबास भेट देऊन पीक नुकसानीचे पाहणी केली. तसेच वाशी शहरातील काही दुकांनामध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे मोठ्या प्रमाणार नुकसान झालेल्या ठिकाणीही त्यांनी पाहणी केली. दौऱ्यादरम्यान मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, चिंता व तातडीच्या गरजा समजून घेतल्या. शेतकऱ्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान, जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता तसेच घरांचे झालेले नुकसान याबाबत माहिती दिली. 
  यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत कार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना विमा हप्ता, पीक कर्ज पुनर्नियोजन, बियाणे व औषधांची उपलब्धता यासाठीही आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गुडघाभर पाण्यातून व चिखलातून थेट बांधावर येत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतक-यांना आधार दिला. तसेच  शेतकरी संकटात असताना सरकार पाठीशी खंबीरपणे असल्याचे ही त्यांनी यावेळी कृतितून शेतक-यांना दाखवून दिले.  
    कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,"शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशा वेळी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. नुकसानभरपाई व आवश्यक मदत तातडीने पोहोचवली जाईल.तसेच शेतकऱ्यांना हवामान बदलाशी लढा देण्यासाठी पिक विमा, हवामान माहिती व पिक बदल संदर्भात मार्गदर्शन यासारख्या उपाययोजना केल्या जातील."
    "शेतकऱ्यांच्या दु:खात शासन त्यांच्या पाठीशी आहे. मदत आणि दिलासा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे," असे आश्वासन कृषी मंत्री महोदयांनी दिले.
       धाराशिव जिल्ह्यातील पाहणी दरम्यान माजी आमदार राहुल मोटे, कृषी व महसूल अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान बाधित शेतकरी बांधवांनी मंत्री महोदयांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.
      कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला शेतक-यांना आधार
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पाहणी दौरा
स्वतः शेतकरी असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतक-यांसाठी धावून आले.
कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन  शेतक-यांशी साधला संवाद.

Post a Comment

0 Comments