संपुर्ण शहर खड्ड्यात, तरुणाचा गेला नाहक बळी
सोमवारी धाराशिव बंदची हाक ; २५ संघटना उतरणार रस्त्यावर : काळ्या फिती लावून मूक मोर्चाचे आयोजन
धाराशिव, दि. 19 : रस्त्यावरील खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतल्यानंतर शहरातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. अनेकजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेकांचे जीव गमावले आहेत. जीव धोक्यात घेऊन शहरातून प्रवास करावा लागत असल्याने विविध २५ संघटनांनी मिळून सोमवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शहर बंदची हाक दिली आहे. वाढत्या खड्डयांच्या, निकृष्ट मतेदार, टक्केवारी फेम अधिकारी व याला पाठबळ घालणारे राजकीय पुढारी यांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून सोमवारी मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.
राजमाता जिजाऊ चौक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी चौक या रस्त्यावर गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळेस खड्डे बुजवण्याचे टेंडर काडल्याचे लोकातून ऐकावयास येत आहे परंतु टक्केवारी फेम अधिकाऱ्यांनी व निकृष्ट गुत्तेदारांनी हे काम कसे केले आहे हे शहरवासीयांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. या गोष्टीला राजकीय पाठबळ असल्याने नागरिक हे सर्व निमुटपणे सहन करीत होते परंतु लोकांच्या नरडी पर्यंत आल्यावर लोक ही आता आवाज उठवू लागले आहेत. लोक आता उघडपणे हे सर्व बोलू लागल्याने निकृष्ट काम करणारे गुत्तेदार, टक्केवारी फेम अधिकारी व भ्रष्टाचाराला पाठबळ घालणारे राजकीय पदाधिकारी यांचीही आता भंबेरी उडाली आहे. आपलं दुकान आता जनता बंद करते की काय असे यांना वाटू लागले आहे. यासाठी तेरणेचा छावा ने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.
परंतु ही अवस्था शहरातील एकाच रस्त्याची नसून अनेक रोडवर असेच प्रताप या लॉबी न केलेले आहेत. एकाच रोडवर नगरपालिकेची, बांधकाम विभागाची, दोन ठिकाणची कामे दाखवून तसेच काही ठिकाणी काम न करताच पैसे उचलल्याचे प्रताप एकावयास येत आहेत, परंतु हे सर्व भ्रष्टाचारी लॉबीच्या सहमतीने होत असल्याने एकमेकावर पांघरूण घालण्याचे काम करत असल्यामुळे या सर्व शहराचा बट्ट्याबोळ झालेला आहे, नवीन आलेल्या नागरिकांना तर हे शहर आहे की खेड असाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
या सर्व घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी 9:30 वाजता शहरातील माऊली चौक येथून मूक मोर्चा सुरू होणार आहे. शहरातील विविध २५ संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. परिसरातील सामान्य नागरिकही या मोर्चात सहभागी होणार आहेत. केवळ भ्रष्टाचारी लॉबीने तरुण व्यापाऱ्याचा बळी घेतलेला आहे त्यामुळे शहरातील व्यापारी बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा विधीज्ञ मंडळ, सराफ सुवर्णकार असोसिएशन, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना, जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया, विविध वाहतूकदार संघटना, सराफ सुवर्णकार कारागीर संघटना, जिल्हा मोटार मालक वाहतूक संघटना, जिल्हा सिड्स अँड फर्टिलायझर असोसिएशन, मशिनरी असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, अडत व्यापारी असोसिएशन, जिल्हा मुद्रक संघटना, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, धाराशिव पेट्रोलपंप चालक-मालक संघटना, उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्यासह विविध २५ संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.
गुरुवारी रात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील खड्ड्यामुळे ओंकार जाधवर या 23 वर्षीय युवा व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाला जाधवर कुटुंबीय मुकले आहेत. आठवडाभरापूर्वी श्रीपतराव भोसले हायस्कूल परिसरातही खड्ड्यात पडून एक वृद्ध महिलेचा अंत झाला आहे. या भ्रष्टाचारी लॉबीमुळे शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठी कसरत करीत वाहनचालकांना या रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. वाढलेल्या या खड्ड्यांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अनेक कुटुंबांना लाखो रुपयांचा उपचार केवळ या खड्ड्यांमुळे घ्यावे लागले आहेत. तर खड्ड्यात पडून झालेल्या अपघातामुळे अनेकजणांना कायमचे अपंगत्व आले. सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी शहर बंद आणि मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने शहरातील माता-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागी व्हावे असे आव्हान वरील सर्व संघटनांनी मिळून केले आहे.
0 Comments