Subscribe Us

भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य निवडणुकीच्या मैदानात उतरणारभाजप धक्का तंत्राचा वापर करणार ?


उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी
धाराशिव /तेरणेचा छावा:- धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून कोण निवडणूक लढणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे ही जागा महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणत्या घटक पक्षाला देणार याबाबत देखील संभ्रमावस्था कायम आहे. या जागेसाठी अनेकांनी दावेदारी केली असली तरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी थेट मुंबई येथे  जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांच्या निवासस्थान गाठले. तसेच मी पण निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची इच्छा चालुक्य यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला सुटणार व कोणता मल्ल रिंगणात उतरणार ? याची उत्सुकता घटक पक्षातील कार्यकर्त्यांना लागू राहिले आहे. दरम्यान, भाजप धक्का तंत्राचा वापर करणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
        धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मतदार संघात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या जाहीर सभेत जाहीर केली आहे. त्यामुळे खा. राजेनिंबाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देखील महायुतीच्यावतीने अद्यापपर्यंत देखील उमेदवारी जाहीर केलेली नाही. ही जागा लढविण्यासाठी माहितीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, मंत्री प्रा डॉ सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. सुरेश बिराजदार यांनी तसेच भारतीय जनता पार्टीकडून आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, बसवराज मंगरुळे, ऍड व्यंकटराव गुंड, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आदींनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला यावर वरिष्ठ पातळीवर घामासन सुरू आहे. मात्र निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांना उत्सुकता लागलेली असतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी तालुके यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन उमेदवारीची मागणी वजा गळ घातली आहे. या उमेदवारीसाठी महायुतीतील घटक पक्षांचे पक्ष प्रमुख कोणत्याही परिस्थितीत आपल्याच उमेदवाराला ही जागा मिळायला पाहिजे यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारी देण्यासाठी घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मात्र निर्णय लागत नसल्यामुळे ही जागा नक्की कोणत्या पक्षाला मिळणार हे निश्चित होऊ शकले नाही. शिवसेना व भाजप या पक्षांकडून यासाठी जोरदार फील्डिंग लावण्यात येत असून दररोज वेगवेगळे चेहरे समोर येत आहेत. त्यातच भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी ऐनवेळी एन्ट्री करून उमेदवारीची मागणी केल्यामुळे आजपर्यंत उमेदवारीची मागणी करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कधी व कोणता देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments