Subscribe Us

गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त, एकाचा निलंबनाचा प्रस्ताव,आरोग्य सेवक निलंबित

गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त,एकाचा निलंबनाचा प्रस्ताव,आरोग्य सेवक निलंबित
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांची कारवाई

धाराशिव/तेरणेचा छावा:-  प्राथमिक आरोग्य केंद्र दहीफळ ता.कळंब, येथे गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी कठोर कार्यवाही करत दोन वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सेवा तात्काळ समाप्त केल्या आहेत.तर एका नियमीत वैद्यकिय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.अधिकार नसताना चुकीचे इंजेक्शन देणाऱ्या आरोग्य सेवकाचे निलंबन करण्यात आले आहे.
                 जिल्हयात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारुन एनक्युएएस मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची राज्य पातळीवरील तपासणी पूर्ण झालेली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाहयरुग्ण तसेच प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य पातळीवरील रॅकींगमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातत्याने राज्यात पहिल्या ५ जिल्हयात स्थान टिकवून आहे.तसेच क्षयरोग निर्मुलन व कुष्ठरोग निर्मुलनात देखील  जिल्हयाने राज्यात उत्कृष्ठ काम केले आहे.
             सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबवून आरोग्य सेवेचा दर्जा उच्च राखत असताना निष्काळजीपणे वागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर यापुढेही कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमीत उपस्थिती आधारलिंक बायोमेट्रीकव्दारे तपासण्यात येते.कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी लवकरच जी.पी.एस.हजेरी प्रणाली राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.
        या प्रकरणातील गर्भवती मातेची प्रकृती स्थिर असून सद्यस्थितीत माता व बालक सुरक्षित आहेत.दर १५ दिवसाला या मातेची तपासणी केली जाणार आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली. ही बातमी सर्वप्रथम तेरणेचा छावा  लाईव्हने उजेडात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments