Subscribe Us

ग्रामपंचायत जागेत घरकुल बांधण्यास विरोध केल्याने महिला सरपंचास शिवीगाळ तर ग्रामसेवकास अ‍ॅट्रोसिटी करण्याची धमकी


कामेगाव येथील प्रकार, दोघावर गुन्हा दाखल

धाराशिव तेरणेचा छावा:+
तालुक्यातील कामेगाव येथे ग्रामपंचायत जागेत घरकुल बांधण्यास विरोध केल्याने सरपंचासह सदस्य यांना शिवीगाळ केली. तर ग्रामसेवकास तुला अ‍ॅट्रोसिटीमध्येच गुंतवतो, अशी धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि.३१) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघावर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बेंबळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील कामेगाव येथे आरोपी बालाजी यल्लाप्पा पारसे याचे शासकीय जागेत अतिक्रमण करुन बांधकाम चालू होते. ते तात्काळ थांबविण्यात यावे, तसेच केलेले अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे, यासाठी नोटीस देण्यासाठी महिला सरपंच अमिता बालाजी वाघमारे या उपसरपंच मिरा राहुल कदम, सदस्य सुनंदा शिवाजी वाघमारे, बिरु महादेव शेवाळे व ग्रामसेवक डी. बी. सोकांडे यांच्यासह गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आरोपींना ग्रामपंचायत कार्यालयाचे जागेत घरकुल बांधू नका, असे सांगत असताना आरोपी बालाजी यल्लाप्पा पारसे व बब्रुवान यल्लाप्पा पारसे यांनी तुम्ही मला सांगणारे कोण, तुमचा काय संबध, मी तुम्हाला ओळखत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी ग्रामसेवक डी. बी. सोकांडे यांनी सदरील बांधकाम करु नये, अशी नोटीस आरोपीच्या घराच्या भिंतीवर चिकटवत असताना नमुद आरोपींनी सरपंच व ग्रामसेवक यांना शिवीगाळ करुन ग्रामसेवक यांना तुला अ‍ॅट्रोसिटीमध्येच गुंतवतो अशी धमकी दिली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुजित चंद्रकांत कदम यांनीही सदरील आरोपींना व्यवस्थीत बोला, शिव्या देवून नका असे सांगितले असता त्यांनाही तुझा यामध्ये बोलण्याचा संबध नाही, असे म्हणत आरेरावीची भाषा वापरली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या सरपंच अमिता वाघमारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम ३५३, ५०९, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
यापुर्वीही आरोपी बालाजी यल्लाप्पा पारसे याने उपसरपंच पती राहुल अशोकराव कदम यांच्यावर खोटी अ‍ॅट्रोसिटी दाखल केली होती. त्याचप्रमाणे यावेळीही त्यांने अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे विनाकारण शासकीय कामात अडथळे आणणे, याशिवाय दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे बोलणे वारंवार गावात होत आहे. त्यामुळे गावात शांततेचा भंग होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिकांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments