Subscribe Us

शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे उपोषण!



उस्मानाबाद/ तेरणेचा छावा - जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजू विचारात न घेता महसूल प्रशासनाने वर्ग १ च्या जमिनी रातोरात थेट वर्ग २ मध्ये केलेल्या आहेत. या निर्णयास महसूल मंत्र्यांनी आदेशाद्वारे स्थगिती दिली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून केली जात नाही. त्यामुळे शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून ही मागणी लावून धरण्यासाठी जे आंदोलन  केले जात  आहे त्यात  शेतकऱ्यांची पुन्हा फसगत केली जात आहे की काय ? असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.तसेच अल्पभूधारक शेतकरी शासनाचा नियमाप्रमाणे नजरांना भरण्यास तयार असतानाही काही धनदांडगे शेतकरी त्यांना भरू देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
      उस्मानाबाद जिल्ह्यातील निजाम कालीन‌ जमिनी वतन म्हणून दान दिलेल्या जमिनीचा नजराना भरून वर्ग १ मध्ये केलेल्या आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने आडमुठेपणाचे सोंग घेऊन एकतर्फी कारवाई करीत वर्ग १ मधील जमिनी वर्ग २ मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. त्यामुळे महसूल मंत्री विखे-पाटील यांनी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी न करता तो निर्णय कचराकुंडी टाकण्याचे कारस्थान जिल्हा प्रशासनाने चालविले आहे. त्यामुळे मजोर प्रशासनाच्या विरोधात शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित शेतकरी व प्लॉट धारक दि.२७ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना निरोप देण्यात येत आहेत. मात्र काहीजण त्यांची दिशाभूल करीत असल्यामुळे त्या पिडीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, सुभाष पवार, अभिजीत पवार, संजय पवार, फिरोज पल्ला, उमेश राजेनिंबाळकर, प्रा. अर्जुन पवार, दिलीप देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments