Subscribe Us

दुष्काळी परिस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग रद्द करा; भाजपच्या जि.प.सदस्या अनुजा कोकाटे यांची मागणी


तेरणेचा छावा/धाराशिव : कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथे दुष्काळी परिस्थिती असतानाही सोयाबीन पिकाच्या कापणीचा प्रयोग करण्यात आल्याने तो रद्द करून दुसऱ्या प्लॉटची नव्याने निवड करावी, अशी मागणी भाजपच्या येरमाळा गटातील जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुजा रामकिसन कोकाटे यांनी जिल्हा कृषी अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बांगरवाडी येथे सोयाबीन पिकाच्या कापणीचा प्रयोग क्रमांक २ शेतकरी रामराव जरीचंद सानप यांच्या शेतात करण्यात आला. मात्र, सदर शेतकऱ्याने पिकाला तीन ते चार वेळा पाणी दिल्याने पिकाची वाढ चांगली झाली असून, धान्याचे उतारे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कळंब तालुका तसेच येरमाळा महसूल मंडळात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध असलेल्या शेतातील पिकाचा कापणी प्रयोग केल्यास परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत उत्पादनाचे प्रमाण अधिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका अनुजा कोकाटे यांनी मांडली आहे.
त्यामुळे सदर प्लॉटचा पीक कापणी प्रयोग रद्द करावा किंवा त्याऐवजी दुसऱ्या प्लॉटची नव्याने निवड करून पीक कापणी प्रयोग घ्यावा. तसेच शेतकऱ्यांना योग्य पीक विमा मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, तहसीलदार कळंब आणि तालुका कृषी अधिकारी कळंब यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments