निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात खड्डे आणि चिखलाचा कहर; जिल्हा परिषद अध्यक्षा, खासदार व आमदारांनी तातडीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी
तेरणेचा छावा / शेलगाव दिवाणे
येथील मुख्य रस्ता गेल्या तब्बल दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला, रुग्ण, वाहनचालक आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या, तसेच विविध माध्यमांतून हा प्रश्न सातत्याने मांडण्यात आला. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या काळात रस्ता दुरुस्तीची मोठमोठी आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुका संपल्यानंतर आश्वासनांचा विसर पडतो आणि नागरिकांच्या नशिबी पुन्हा खड्डे, चिखल व हालअपेष्टाच येतात.
शेलगाव दिवाणे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्षा, खासदार, आमदार तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी मंजूर करावा व रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा लवकरच तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे प्रशासन आता तरी जागे होते की नाही व रस्त्याचा प्रश्न मार्गी लागतो की नाही हे पाहणे चर्चेचा विषय बनला आहे.
0 Comments