Subscribe Us

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू


तेरणेचा छावा/धाराशिव:- मराठा समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संबंधित बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) तथा अध्यक्ष,मंत्रिमंडळ उपसमिती यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे २०२६ व २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
   बैठकीत हैदराबाद गॅझेटीअर लागू झाल्यानंतर अद्यापपर्यंत झालेल्या दाखले वाटपाचा आढावा घेण्यात आला.तसेच नोंदी शोधणे,कुणबी जात प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्र याबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी आणि इतर संबंधित समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करून तिचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याशिवाय या विषयांचे प्रभावीपणे हाताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
    या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात नोंदी शोधणे,कुणबी जात प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित बाबींमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी श्री.दत्तात्रय गायकवाड,तहसीलदार (संगायो),जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे ०२४७२-२२७३०१ हा दूरध्वनी क्रमांक हेल्पलाईन म्हणून कार्यान्वित करण्यात आला आहे.
   जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की,कुणबी जात प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी ०२४७२-२२७३०१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments