Subscribe Us

परंड्यात गुटखा माफियांवर पहाटेची सर्जिकल स्ट्राइक! 1 कोटी 76 लाखाचा गुटखा जप्त!


चार जिल्ह्यांच्या पथकाची धडक कारवाई; तब्बल १ कोटी ७६ लाखांचा गुटखा जप्त
तेरणेचा छावा/धाराशिव:-
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात बेकायदेशीर अन्नपदार्थ व प्रतिबंधित पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, त्याचा फटका आता थेट गुटखा माफियांना बसू लागला आहे. धाराशिव जिल्ह्यात खवा आणि दूध भेसळ प्रकरणांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी पहाटे परंडा शहरात गुटखा साठेबाजांवर मोठी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
    अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहआयुक्त शशिकांत करकारे यांना परंडा शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सांगली, पुणे, धाराशिव आणि सोलापूर येथील अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाईचे नियोजन करण्यात आले.
    नियोजनानुसार पहाटे चार वाजता चार स्वतंत्र पथकांनी परंडा शहरातील चार ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली. ही कारवाई इतकी गोपनीय ठेवण्यात आली होती की स्थानिक प्रशासनालाही शेवटच्या क्षणापर्यंत याची माहिती नव्हती.
   शहरातील बावची चौक परिसरातील तीन वेगवेगळ्या गोदामांवर टाकलेल्या धाडीत १ कोटी १ लाख ८८ हजार ५०८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच बसस्थानक रोडवरील एका बेकरीजवळील ठिकाणी केलेल्या कारवाईत आणखी ७४ लाख ७८ हजार ७५५ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
     या धाडीत सहायक आयुक्त प्रमोदकुमार काकडे, संतोष सावंत, डॉ. सुमित खांडेकर, वीर स्वामी, उमेश भुसे, धनंजय आगाव, रोहित फंदी, गणेश, अभिजित झोडगे, ऋषिकेश मते यांच्यासह परंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
    कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा परंडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, या साठ्याचा खरा मालक कोण आहे, संबंधित गोदामे कोणाची आहेत, ती भाड्याने कोणाला देण्यात आली होती, या सर्व बाबींचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातून मोठ्या गुटखा रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भीतीचे सावट; दिवसभर एकही टपरी उघडली नाही
कारवाईची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच परंडा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या अनेक टपऱ्या व दुकाने दिवसभर बंद राहिली. कारवाईच्या भीतीने काही विक्रेते शहराबाहेर गेल्याचीही चर्चा होती.
    जप्त केलेल्या गुटख्याचे प्रमाण इतके मोठे होते की तो पोलीस ठाण्यात हलविण्यासाठी मोठ्या टेम्पोच्या दोन फेऱ्या कराव्या लागल्या.

धाराशिवमधील गुटखा माफियांचे धाबे दणाणले
परंड्यातील या अभूतपूर्व कारवाईनंतर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. धाराशिव शहरातही दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, अशा ठिकाणांवरही तातडीने धाड टाकून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.
    "मुंडे पॅटर्न"च्या या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांचे आर्थिक कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात आणखी मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments