Subscribe Us

मोठमोठे खड्डे, पुलावर भगदाड; ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा



तेरणेचा छावा/धाराशिव:-
कळंब तालुक्यातील दहिफळ-परतापूर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
गुरुवार, ५ जून रोजी देण्यात आलेल्या निवेदनात दहिफळ-परतापूर रस्ता २२ जून २०२६ पर्यंत दुरुस्त न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दोन वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केला होता. आज या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवताना अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत.
हा रस्ता दहा ते पंधरा गावांसाठी मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे. याच मार्गाने शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. सततची वाहनांची वर्दळ आणि खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
याशिवाय गावालगतच्या नदीवरील पुलावरही मोठे भगदाड पडले असून काही ठिकाणी रस्ता दबला आहे. पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने परिस्थिती आणखी धोकादायक बनते. सध्या पुलावरील खड्डे आणि बाजूला पडलेले मोठे भगदाड यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्याची आणि पुलाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा जीवितधोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा २२ जूननंतर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना पोपट पाटील, भगवान मते, तानाजी ढवळे (माजी ग्रामपंचायत सदस्य), प्रशांत भातलवंडे, नारायण भातलवंडे, सुरेश मते, शिवशंकर भातलवंडे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments