कला केंद्र परिसरात अवैध व्यवसायीक व गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्तींचा वाढता वावर मोठमोठ्या मारामाऱ्या आणि गोळीबार!अनेक आंबटशौकीनांना मिळाला होता मारहाणीचा प्रसाद,स्वतःच्या अब्रूसाठी अनेकांनी लपवली होती तोंडे!
धाराशिव /तेरणेचा छावा:-
धाराशिव कारखान्याजवळील चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्रावर प्रशासनाने कठोर कारवाई करत त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असून केंद्र तात्काळ सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्यानंतर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने महाकाली कला केंद्र मंगळवार (दि. 14 एप्रिल )रोजी 10:58 वाजता टाळे ठोकत शील करण्यात आले. यावेळी येरमाळा मंडल अधिकारी नारायण नागटिळक येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद शिंदे ,महंमद सय्यद, चोराखळीचे तलाठी प्रवीण जमादार कोतवाल नारायण पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
त्यामुळे वादग्रस्त आणि गुंडगिरीचा अड्डा बनलेल्या महाकाली कला केंद्राचा अखेर बाजार उठला असून धाराशिव जिल्हा कलाकेंद्र मुक्त झाला आहे.
दरम्यान, कला केंद्रातील प्रकरणात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही कडक भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर तहसीलदार हेमंत ढोकले महसूल व पोलीस विभागाने संयुक्त अहवाल सादर करत केंद्रातील गंभीर अनियमितता अधोरेखित केल्या होत्या.
चौकशीत महाकाली कला केंद्रात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. इमारतीसाठी आवश्यक बांधकाम परवानगी नसणे, प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग नसणे, रंगमंच व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा नसणे, अशा मूलभूत त्रुटी आढळल्या. तसेच 10 वातानुकूलित खोल्यांमध्ये नृत्य सादरीकरण चालत असल्याचे निदर्शनास आले. पारंपरिक कलाप्रदर्शनाऐवजी साउंड सिस्टीमवर नृत्य कार्यक्रम घेतले जात असल्याचेही स्पष्ट झाले.याशिवाय छापील तिकीट व जीएसटी नोंदींचा अभाव, कलाकारांची अधिकृत माहिती पोलिसांकडे न सादर करणे, तसेच परिसरालगत बियर बार व लॉजिंग सुरू असल्यासारख्या बाबी अहवालात नमूद करण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव व त्यासंबंधित स्वाक्षऱ्यांची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे आढळले.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करत ते तात्काळ सील करण्याचे आदेश दिले. व स्थानिक प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करत टाळे ठोकत शीलबंद केले दीर्घकाळ चाललेल्या तक्रारी, चौकश्या आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या प्रकरणी निर्णायक कारवाई झाली आहे.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे कला केंद्र चालु ठेवल्यास कार्यवाहीचा इशारा जिल्हाधिकारी यांनी आदेशात दिला आहे.
त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व कला केंद्र बंद झालेली असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कला केंद्राच्या आसपास दररोजच कुठे ना कुठे आंबटशौकिनांना मारहाण,गोळीबार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण तयार झाले होते. कारण या ठिकाणी अवैध व्यवसायीक व गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यसनी असलेल्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता.परिसरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण परिसरातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी जाण्या येण्यासाठी थांबाही तेथेच जवळच असल्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला आहे. अशाप्रकारे संपूर्ण धाराशिव जिल्हा कलाकेंद्र मुक्त झाल्याचे आज घडीला दिसून येत आहे.
0 Comments