Subscribe Us

अखेर महाकाली कला केंद्राचा बाजार उठला, कारवाई,परवाना रद्द करून सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


कलाकेंद्र परिसरात घडत होत्या मोठमोठ्या मारामाऱ्या आणि गोळीबार!अनेक आंबटशौकीनाना मिळाला होता जबर मारहाणीचा प्रसाद.
धाराशिव /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील  महाकाली कलाकेंद्रावर  प्रशासनाने कठोर कारवाई करत त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असून केंद्र तात्काळ सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. वादग्रस्त आणि गुंडगिरीचा अड्डा बनलेल्या महाकाली कला केंद्राचा अखेर बाजार उठला. 
    उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत ही निर्णायक पावले उचलली आहेत. त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा आता प्रत्यक्ष सीलिंग कारवाईसाठी सज्ज झाली आहे.
महाकाली कला केंद्राचे चालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे इतर कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत याचिका मागे घेण्याचा इशारा दिला. न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत “याचिका मागे घ्या अन्यथा फेटाळू” असे स्पष्ट झाल्यानंतर माळी यांच्या वकिलांनी माघार घेत याचिका मागे घेतली. यापूर्वी देण्यात आलेला अंतरिम दिलासाही न्यायालयाने रद्द केला, त्यामुळे प्रशासनाचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, कला केंद्रातील प्रकरणात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही ठोस भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. तसेच महसूल व पोलीस विभागाने संयुक्त अहवाल सादर करत केंद्रातील गंभीर अनियमितता अधोरेखित केल्या होत्या.
चौकशीत महाकाली कला केंद्रात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. इमारतीसाठी आवश्यक बांधकाम परवानगी नसणे, प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग नसणे, रंगमंच व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा नसणे, अशा मूलभूत त्रुटी आढळल्या. तसेच 10 वातानुकूलित खोल्यांमध्ये नृत्य सादरीकरण चालत असल्याचे निदर्शनास आले. पारंपरिक कलाप्रदर्शनाऐवजी साउंड सिस्टीमवर नृत्य कार्यक्रम घेतले जात असल्याचेही स्पष्ट झाले.
याशिवाय छापील तिकीट व जीएसटी नोंदींचा अभाव, कलाकारांची अधिकृत माहिती पोलिसांकडे न सादर करणे, तसेच परिसरालगत बियर बार व लॉजिंग सुरू असल्यासारख्या बाबी अहवालात नमूद करण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव व त्यासंबंधित स्वाक्षऱ्यांची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे आढळले.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करत ते तात्काळ सील करण्याचे आदेश दिले. दीर्घकाळ चाललेल्या तक्रारी, चौकश्या आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या प्रकरणी निर्णायक कारवाई झाली आहे.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे कला केंद्र चालु ठेवल्यास कार्यवाहीचा इशारा जिल्हाधिकारी यांनी आदेशात दिला आहे.
  अशाप्रकारे धाराशिव जिल्ह्यातील इतर सर्व कला केंद्र बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या आधीच आदेश देऊन बंद करण्यात आली होती परंतु महाकाली कलाकेंद्रने न्यायालयात जात काही अटीवर तात्पुरती स्थगिती आणली होती. परंतु त्या अटीचाही शर्तभग झाल्यामुळे न्यायालयातून ती याचिका मागे घेतल्याने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व कला केंद्र बंद झालेली असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या कला केंद्राच्या आसपास दररोजच कुठे ना कुठे आंबटशौकिनांना मारहाण,गोळीबार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण तयार झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Post a Comment

0 Comments