तेरणेचा छावा/बावी:-
बावी ता.वाशी गावात दारूबंदी व तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी एक सकारात्मक व निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे.गावातील तरुण अशोक रामहरी शिंदे यांच्या पुढाकाराने व आवाहनाला प्रतिसाद देत काल सायंकाळी विठ्ठल–रुक्मिणी मंदिर येथे ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रमुख नेतेमंडळी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, दारूबंदी हाच गावातील वाढत्या सामाजिक अस्वस्थतेवर, अपघातांवर, कौटुंबिक हिंसाचारावर आणि तरुण पिढीच्या अधःपतनावर एकमेव प्रभावी उपाय आहे.
बैठकीत बोलताना पत्रकार अनिल धावरे यांनी दारूबंदी व व्यसनमुक्तीच्या विषयावर आपली ठाम भूमिका मांडली. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून, अपघातांमुळे काही कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी समाजाने पुढे येणे ही काळाची गरज असून, दारूबंदी ही केवळ बंदी नसून माणुसकीची चळवळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गावातील तरुण शिक्षक बालाजी ढाणे यांनी देखील दारूबंदी व व्यसनमुक्ती विषयावर प्रभावी भाषण केले. पारगाव येथील एका महिलेने कला केंद्राला ठाम विरोध करून समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. ज्या प्रकारे त्या महिलेने एकटी उभी राहून समाजबदलाचा मार्ग दाखवला, त्याच धर्तीवर बावी गावातील महिलांनीही पुढाकार घेऊन दारूबंदी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले :
व्यसनमुक्तीसाठी विशेष ग्रामसभा दिनांक २६ जानेवारी रोजी आयोजित करण्याचा ठराव.
दारूबंदी व व्यसनमुक्तीसाठी विशेष समितीची घोषणा, जी जनजागृती व पुढील कार्यवाहीचे नियोजन करणार आहे.
गावातील सर्व वैध व अवैध धंदे तसेच दारूविक्री पूर्णतः बंद करण्याचा ठाम निर्धार.
गावातील सर्व महिला भगिनींनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन विशेष ग्रामसभेचा संदेश पोहोचवावा व जास्तीत जास्त महिलांनी ग्रामसभेत सहभागी व्हावे, असा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमाबाबत बोलताना अशोक शिंदे यांनी स्पष्ट केले की,
“ही चळवळ कोणाच्या विरोधात नसून आपल्या गावाच्या, आपल्या मुलांच्या आणि आपल्या भविष्याच्या बाजूने आहे. गाव एकजुटीने उभे राहिले तर बदल अटळ आहे.”
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे व्यसनमुक्त, सुरक्षित व सुसंस्कृत बावी गाव घडवण्याचा विश्वास या बैठकीतून अधिक बळकट झाला आहे.
0 Comments