तेरणेचा छावा/दहिफळ:-
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दहिफळ या गावाला एकाही पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे सर्वच पक्षांनी बेदखल केल्याची चर्चा मात्र गावकऱ्यातून मोठ्या प्रमाणात ऐकावयास येत आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सभापती,पंचायत समिती सभापती अशी सर्वोच्च पदे या गावाने भूषवलेली आहेत. हे गाव राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे व प्रगल्भ असतानाही नेमकं राजकीय पक्षांनी येथील उमेदवारांना कशासाठी डावलले याचेही आत्मचिंतन येथील नेते मंडळींनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी गावात तिकीट मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना साथ देत होते परंतु आता नेमकं उलट होताना दिसून येत आहे. त्यामुळे गावाचा प्रवास नेमका कसा सुरू आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
आजपर्यंत या गावाला जिल्हा परिषद गटाची अथवा पंचायत समिती गणाची उमेदवारी कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून देण्यात येत होती. परंतु यावर्षी प्रथमच कुठल्याच राजकीय पक्षांनी दहिफळला उमेदवारी देण्यासाठी पसंती न दिल्यामुळे गावकऱ्यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत असून आपणही आता राजकीय पक्षांना आमची किंमत दाखवूनच देऊ अशी चर्चा गावातील नागरिकांतून मोठ्या प्रमाणात ऐकावयास येऊ लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गावकरी कोणता निर्णय घेतात हे थोड्याच दिवसात दिसून येणार आहे.
0 Comments