Subscribe Us

दारूबंदीसाठी दहिफळच्या रणरागिणींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.


शाळा दीड किलोमीटर दारूची दुकाने गावात.

   ग्रामपंचायत कार्यालयाने पाठिंबा देत अधिकाऱ्यांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे दिले आमंत्रण.
 
तेरणेचा छावा/धाराशिव: - दहिफळ येथील सर्व दारु, मद्यविक्री दुकाने बंद करावी. गावातील अवैध दारू विक्री, सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी प्रचंड गर्जना करीत दारूबंदी झालीच पाहिजे अशी आक्रमक मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवार(दि.३० डिसेंबर)रोजी केली.
     
कळंब तालुक्यातील दहिफळ गावची लोकसंख्या जवळपास चार हजारच्या घरात आहे. याच गावात देशी दारूचे दुकान, पाच बिअर बार व एक बिअर शॉपी दुकाने आहेत. तर याच गावात एक डान्सबार, कला केंद्र आणि नवीन पाच बिअर बार परवाने मागण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण महिलांना लागली. गावातील बहुतांश नागरिक व्यसनात पूर्णपणे बुडून गेलेली आहेत. तर तरुण मंडळी दारूच्या नशेत गुंग झाल्याने ते वाटेल ते धंदे करीत आहेत. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थी देखील दारूच्या आहारी जात आहेत. या दारुड्यांचा पूर्ण गावाला विळखा असल्यामुळे या गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या दारुड्यामुळेच गावातील महिला व मुलींना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.   यामुळे कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. या दारुमुळेच घरगुती हिंसाचार, आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या तसेच सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली आहे. शाळा दीड किलोमीटरवर आणि देशी दारू, बिअर बार गावात अशी गावाची अवस्था झाली आहे. 
    महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ व मुंबई दारूबंदी (ग्रामपंचायत ठराव पारित केल्यामुळे अथवा नगर परिषद/महानगर पालिकेच्या वॉर्डातील मतदारांनी निवेदन दिल्यामुळे अनुज्ञप्ती बंद करणे) आदेश, २००८ मधील तसेच शासन अधिसूचना दिनांक १२.०२.२००९ नुसार, एखाद्या गावातील महिलांनी/मतदारांनी बहुमताने मागणी केल्यास संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्याची कार्यवाही करता येते. तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, २०१६ कलम १३४ (अ) आणि महाराष्ट्र ग्राम रक्षक दल नियम, २०१७ नुसार गावातील अवैध दारू विक्री, सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम रक्षक दलाची स्थापना करता येते. वरील नियमांनुसार दहिफळ येथील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीची मागणी केली आहे. गावात असलेली दारूची दुकाने बंद करण्यासाठी गांभीर्याने विचार करून तात्काळ ती कारवाई करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर प्रीती पाटील,पल्लवी कुटे,विद्या मते,अंजली ढवळे, वत्सलाबाई भातलवंडे, संध्या मते,भाग्यश्री मते,पारूबाई मते, सरस्वती फरताडे आदींसह ४२० महिलांच्या सह्या आहेत. 
तर ग्रामपंचायत कार्यालयाने महिलांना पाठिंबा देत ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे दिले. 
त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात ? याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. जर दारू बंद केली नाही तर रणरागिनी रस्त्यावर उतरून उपोषण व इतर मार्ग अवलंबून हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत 

Post a Comment

0 Comments