Subscribe Us

दिल्लीत झळकला येडाई एफपीओचा झेंडा! चेअरमन सुमन माणिकराव तांबारे यांना प्रतिष्ठेचा ‘प्राईड ऑफ भारत’ राष्ट्रीय पुरस्कार


तेरणेचा छावा विशेष प्रतिनिधी:-
कृषी क्षेत्रात शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक शेतीचा प्रसार आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत येडाई फार्मर प्रोड्युसर कंपनी (एफपीओ) चे चेअरमन श्री. सुमन माणिकराव तांबारे यांना प्रतिष्ठेचा ‘प्राईड ऑफ भारत’ पुरस्कार मंगळवार (दि.28 जुलै) रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करून गौरविण्यात आले.
   सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि अचिवर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विकसित भारत अभियान’ अंतर्गत राजधानी नवी दिल्ली येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींच्या उपस्थितीत श्री. तांबारे यांनी हा सन्मान स्वीकारला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खा. बजरंग सोनवणे, खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. भास्कर भगरे, अचिवर्स फाउंडेशनच्या जुही कुमारी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे श्री. संदीप पोखरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
येडाई फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांना संघटित करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे येडाई फार्मर प्रोड्युसर कंपनीसह संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गाचा गौरव झाला असून, कृषी क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे. श्री. सुमन माणिकराव तांबारे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments