"
तेरणेचा छावा/धाराशिव:-
तालुक्यातील मौजे ताकवीकी येथे मंजूर झालेल्या वीज डीपी संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांवर आता संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्षेप घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी नसून परिसरातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली सार्वजनिक सुविधा असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी काही माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये वस्तुस्थिती लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच तथाकथित तोतया पीए संदर्भात करण्यात आलेले आरोपही निराधार असल्याचे सांगण्यात आले आहे. विनाकारण काम करणाऱ्या माणसाला बदनाम करण्याचे षडयंत्र आम्ही कदापी सहन करणार नसल्याची तीव्र भावना ग्रामस्थातून ऐकावयास येत आहे. शेतकऱ्यांनी निटुरे यांनीच डीपी मंजुरीच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा दावा केला असून त्यामुळे निटुरे यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. उल्टा चोर कोतवाल को डाटे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर डीपीवरून पात्र शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणे अपेक्षित असताना ती वैयक्तिक असल्याचा दावा करून संभ्रम निर्माण केला जात आहे. यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही सांगण्यात आले.
या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता रडे यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती मांडल्याचे सांगितले. तसेच डीपी मंजुरीची प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित नोंदी तपासून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत ताकवीकीचे सरपंच राजपूत यांनी स्पष्ट केले की, "मंजूर डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी असलेली सुविधा आहे. याबाबत गैरसमज पसरविण्याऐवजी संबंधित विभागाच्या नोंदी तपासून वस्तुस्थिती समोर आणावी. गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे आणि संभ्रम दूर होणे आवश्यक आहे."
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून डीपी संदर्भातील सर्व तथ्ये जनतेसमोर आणून चौकशी करण्याची मागणी संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments